लसीकरण केंद्रावरील गर्दी, संसर्गाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:10 IST2021-04-30T04:10:47+5:302021-04-30T04:10:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणाचा प्रकोप वाढला आहे. दुसरीकडे लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद वाढत असल्याने, महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर ...

लसीकरण केंद्रावरील गर्दी, संसर्गाचा धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाचा प्रकोप वाढला आहे. दुसरीकडे लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद वाढत असल्याने, महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी वाढत आहे. येथे सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर होताना दिसत नाही. लसीकरणासाठी येणाऱ्यात अनेक जण पॉझिटिव्ह असतात. यामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे.
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लसीकरण होणे आवश्यकच आहे. सध्या तरी त्याशिवाय पर्याय नाही. पण ते धोका टाळून झाले पाहिजे. यासाठी लसीकरण केंद्रावर होणाऱ्या गर्दीला आळा घालण्याची गरज आहे. पाचपावली, गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालय, के.टी.नगर, मानेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र महाल, नरसाळा आरोग्य केंद्र, आयसोलेशन, बाभूळबन आयुर्वेदिक डिस्पेन्सरी, डिप्टी सिग्नल, म्हाळगीनगर, भरतवाडा, पारडी मनपा शाळा आदी लसीकरण केंद्रांवर अधिक गर्दी असते. सोशल डिस्टन्स नियमाचा फज्जा उडाला आहे. लसीकरणासाठी नागरिक सकाळी ९ वाजतापासून रांगा लावतात. गर्दीमुळे संक्रमण वाढण्याचा धोका आहे. केंद्रावर लोकांची गर्दी होणार नाही. सुरक्षित अंतर राखले जाईल. सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करण्याची गरज आहे.
...
केंद्रावर सुविधांचा अभाव
अनेक केंद्रावर लसीसाठी येणाऱ्या ज्येष्ठांना भरउन्हात ना पंखा, ना पाणी असलेल्या अवस्थेत तास न् तास लसीकरणासाठी ताटकळत राहावे लागत आहे. एकीकडे केंद्र व राज्य शासनाकडून लसीकरणावर भर देण्यावर जोर दिला जात असून, लसीकरणाचे आवाहन केले जात आहे. दुसरीकडे केंद्रावर आवश्यक सुविधा नाही. यामुळे नागरिकांना त्रास होतो.
...
गर्दी कमी करणासाठी वेळ वाढवा
लस घेण्यासाठी आलेल्यात कोरोनाग्रस्त व्यक्ती असल्यास त्यापासून रांगेतील इतरांना संसर्ग होण्याचा धोका आहे. यावर नागरिक नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी लसीकरणाची वेळ सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत असावी, अशी मागणी होत आहे. लसीकरणाचे तास वाढविले तर केंद्रावरील गर्दी कमी होईल.