रस्त्यावरील गर्दीने केली लॉकडाऊनची पोलखोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:07 IST2021-04-07T04:07:49+5:302021-04-07T04:07:49+5:30
- दुकाने बाहेरून बंद, आतून सुरू : खासगी आस्थापनांनी केली शासकीय निर्देशांकडे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य ...

रस्त्यावरील गर्दीने केली लॉकडाऊनची पोलखोल
- दुकाने बाहेरून बंद, आतून सुरू : खासगी आस्थापनांनी केली शासकीय निर्देशांकडे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारने व मनपा आयुक्तांनी सोमवारी रात्री ८ वाजतापासून ते ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र, मंगळवारी या घोषणेचे तीनतेरा वाजल्याचे दिसून आले. रस्त्यावर असलेल्या नियमित गर्दीने प्रशासनाचे नियोजन फसल्याचेच स्पष्ट झाले.
नागपूरसह राज्यात कोरोना संक्रमणाचा वेग प्रचंड वाढल्याच्या पार्श्वभूमीवर संसर्ग आटोक्यात आणण्याचे उपाय म्हणून नाईलाजास्तव सरकारने संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली. या निर्णयाचा विरोध सर्व स्तरातून होत असला तरी, शासकीय निर्णयाची अंमलबजावणी व्यापाऱ्यांनी केल्याचे दिसून आली. मंगळवारी बाजारपेठा पूर्णत: बंद होत्या. मात्र, खासगी आस्थापनांना शासनाने बंद ठेवण्याचे अगर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्या आदेशाकडे खासगी आस्थापनांनी पूर्णत: दुर्लक्ष केल्याचेच दिसून येत होते. दररोज सकाळी १० वाजता आपल्या कार्यालयाकडे जाणाऱ्या नागरिक कर्मचाऱ्यांची गर्दी रस्त्यांवर यथोचित होती. टाळेबंदी असताना ही गर्दी उसळलीच कशी, असे प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. यावरूनच खासगी आस्थापने बंद ठेवण्यात आली नव्हती. दिखाव्याकरिता ही आस्थापने बाहेरून कुलूपबंद असली तरी मागच्या रस्त्याने कर्मचारी आत शिरत असल्याचे दिसून येत होते. सिव्हिल लाईन्स परिसरात हे चित्र उघडउघड दिसत होते. असेच चित्र काही दुकानदारांचे दिसून येत होते. बाजारपेठांमध्ये असलेल्या काही दुकानासमोर लोक उभे दिसत होते. पोलीस येत असल्याची खबर मिळताच, हे लोक पटकन दुकानाच्या शटरवर थाप मारून पसार होत होते. या थापा म्हणजे, बाहेर पोलीस आले आहेत. आवाज करू नका, असा संदेश आतील कर्मचाऱ्यांसाठीचा होता. या एकूणच परिस्थितीवरून टाळेबंदीचा पहिला दिवस फसल्याचेच दिसत होते.
---------------
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत
टाळेबंदी असली तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोकळीक असल्याने बसस्थानक, रेल्वेस्टेशन, खासगी ट्रॅव्हल्स स्पॉट आदी ठिकाणी कसलाही गोंधळ उडालेला नव्हता. एस.टी. स्टॅण्डवर टाळेबंदीचा प्रभाव दिसून येत होता. टाळेबंदीमुळे निरर्थक येणारे लोक नसल्याने स्टॅण्डवर गर्दी दिसत नव्हती. प्रवासी आपापल्या खुर्चींवर बसून बसेसची वाट बघत होते. एस.टी. बसेसमध्ये शासकीय नियमांचे पूर्णत: पालन केले जात होते. एका आसनावर एकच प्रवासी अशी स्थिती होती. खासगी ट्रॅव्हल्समध्येही हे नियम पाळले जात असल्याचे दिसत होते. मात्र, लहान मार्गावरील खासगी बसेसकडून कोरोना नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र होते. विशेषत: गडचिरोली मार्गावर धावणाऱ्या खासगी बसेसची ही स्थिती होती.
---------------
ऑटो, ई-रिक्षा, ऑनलाईन कॅब्स
बसस्टॅण्ड, खासगी बसेस स्टॅण्ड, रेल्वेस्थानकाच्या बाहेर ऑटो, ई-रिक्षावाले उभे होते. प्रवाशांची आवागमन यंत्रणा या माध्यमातून सुरू होती. ऑनलाईन कॅब्स सेवाही व्यवस्थित सुरू असल्याचे दिसून येत होते. ५० टक्के प्रवासी क्षमतेचे नियम पाळले जात होते. पोलीसही कठोरतेने वागत नसल्याने या सेवांमध्ये कसलाही गोंधळ उडाल्याचे चित्र नव्हते.
....................