डॉनच्या भेटीसाठी ‘भाई लोग’ची गर्दी

By Admin | Updated: May 6, 2015 02:19 IST2015-05-06T02:19:15+5:302015-05-06T02:19:15+5:30

वेळ दुपारी १२ ची. मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात शे-सव्वाशे ‘भाई’लोकांची गर्दी.

The crowd of 'Brothers' crowd for Don's visit | डॉनच्या भेटीसाठी ‘भाई लोग’ची गर्दी

डॉनच्या भेटीसाठी ‘भाई लोग’ची गर्दी

नरेश डोंगरे नागपूर
वेळ दुपारी १२ ची. मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात शे-सव्वाशे ‘भाई’लोकांची गर्दी. तीन वकील अन् मोठ्या प्रमाणातील पोलिसांसोबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्याही नजरा कारागृहाच्या प्रवेशद्वाराकडे रोखलेल्या. रखरखत्या उन्हामुळे मिनिटागणिक अस्वस्थता तीव्र होत होती. दुपारचे १२.३० वाजले, १ वाजला. या दरम्यान प्रवेशद्वार ज्या ज्या वेळी उघडले गेले, त्या त्या वेळी ‘भाई लोग’ अन् छायाचित्रकारांची लगबग वाढली. मात्र आतमधून भलतीच व्यक्ती बाहेर येत असल्याचे पाहून सारेच ‘वो कब आनेवाले है’ असा प्रश्न एक दुसऱ्यांना विचारत होते. अखेर १.३५ वाजता आतमधून सिटी वाजली अन् बाहेरचे सर्व पोलीस ‘अलर्ट’ झाले. प्रवेशद्वारातील छोटे दार उघडले गेले अन् साऱ्यांचीच लगबग वाढली. भाईलोग धावतच पुढे गेले. पांढरा पायजमा, कुर्ता अन् कडक पांढरी टोपी घालून कारागृहाबाहेर आलेल्या व्यक्तीला काहींनी पदस्पर्श केला, काहींनी वाकून नमस्कार केला, तर काहींनी गळाभेट घेतली.
कधीकाळी दगडी चाळीचा अनभिषिक्त सम्राट मानला जाणारा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडी याला नगरसेवक कमलाकर जामसांडेकर याच्या हत्याकांडात कोर्टाने कारावासाची शिक्षा सुनावली. मुंबई, पुणे आणि त्यानंतर नागपूर कारागृहात पोहोचलेला डॉन गेल्या अडीच महिन्यांपासून येथील मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे. त्याचा मुलगा महेश याचे ९ मे रोजी लग्न आहे. डॉन अरुण गवळीची सून नागपूरचीच असली तरी लग्न मात्र मुंबईत आहे. मुलाच्या लग्नसोहळ्यात उपस्थित राहता यावे म्हणून डॉनच्यावतीने पॅरोलसाठी कोर्टात याचिका सादर करण्यात आली होती. ती मंजूर झाल्यानंतरही तांत्रिक कारणामुळे डॉनची सुटका तीन दिवस लांबली. त्यामुळे आज सकाळपासूनच डॉनचे नातेवाईक तसेच डॉनच्या पर्सनल सिक्युरिटीतील ७५ खास साथीदार कारागृहाच्या बाहेर ताटकळत होते.
डॉन के जलवे !
दगडी चाळीचा बेताज बादशहा म्हणून ज्याची ओळख होती, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला जो आव्हान देत होता, मायानगरी मुंबई ज्याच्या नावाने थरथरत होती, तो अंडरवर्ल्ड डॉन अरुण गुलाब गवळी आता ‘अंडासेल’मध्ये राहातो. मात्र, त्याचे जलवे आजही तसेच आहे. मंगळवारी दुपारी तो कारागृहाबाहेर पडला अन् ‘डॉन’च्या पर्सनल सिक्युरिटीतील पाऊणशेवर भाईलोकांनी पोलिसांसकट साऱ्यांंनाच दूर सारत ‘डॉन’चे जलवे दाखवले. गेल्या चार दिवसांपासून साथीदारांना डॉनच्या सुटकेची प्रतीक्षा होती. साथीदारांमध्ये काही शार्प शूटरचाही समावेश होता.

Web Title: The crowd of 'Brothers' crowd for Don's visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.