मेट्रोरिजन निवडणुकीत क्रॉस व्होटिंग
By Admin | Updated: May 18, 2015 02:43 IST2015-05-18T02:43:07+5:302015-05-18T02:43:07+5:30
महानगर नियोजन समितीच्या (मेट्रोरिजन) एकूण २८ जागांसाठी रविवारी झालेल्या मतदानात मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाल्याची माहिती आहे ..

मेट्रोरिजन निवडणुकीत क्रॉस व्होटिंग
नागपूर : महानगर नियोजन समितीच्या (मेट्रोरिजन) एकूण २८ जागांसाठी रविवारी झालेल्या मतदानात मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाल्याची माहिती आहे त्यामुळे धक्कादायक निकाल पुढे येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत ९९ टक्के मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. १९ तारखेला सीताबर्डीतील सांस्कृतिक भवनात सकाळी ८ वा. पासून मतमोजणीला सुरुवात होईल.
मेट्रोरिजनच्या २८ जागांसाठी रविवारी सकाळी ८ वा. पासून मतदानाला सुरुवात झाली. नागपूर शहरातील २० जागांसाठी २५ उमेदवार व १४५ मतदार होते. त्यापैकी १४४ मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. एका नगरसेवकांने मतदान केले नाही. त्याच प्रमाणे ग्रामीण भागातील ८ जागांसाठी १६ उमेदवार रिंगणात होते. एकूण ३३० मतदारांपैकी ३२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
शहरात नगरसेवक मतदार होते. काँग्रेस,भाजप, बसपा आणि शिवसेना यांना त्यांच्या मतांचा कोटा ठरवून देण्यात आला होता. मात्र त्यानुसार मतदान झाले नसल्याची माहिती सूत्रांची दिली. घातपाताचा फटका भाजपचा मित्र पक्ष शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. असाच प्रकार ग्रामीण भागातही घडला असून यामुळे येणारे निकाल धक्का देणारे ठरू शकतात. मतदारांची संख्या कमी असल्याने दुपारपर्यंतच मतदान केंद्रावर धावपळ होती. एका नगरसेवकाने दोन वेळा मतपत्रिकेची मागणी केली. त्यामुळे त्याचे मत अवैध ठरण्याची शक्यता आहे. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडल्याची माहिती निवडणूक विभागातील सूत्रांनी दिली. मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त चोख होता. (प्रतिनिधी)