लाख रुपये कर्ज देऊन बळकावली कोट्यवधीची जमीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:09 IST2021-02-07T04:09:32+5:302021-02-07T04:09:32+5:30
- ओलिस ठेवून कोऱ्या स्टॅम्पवर करवून घेतली स्वाक्षरी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : धंतोली येथील एका बिल्डरला तीन लाख ...

लाख रुपये कर्ज देऊन बळकावली कोट्यवधीची जमीन
- ओलिस ठेवून कोऱ्या स्टॅम्पवर करवून घेतली स्वाक्षरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धंतोली येथील एका बिल्डरला तीन लाख रुपये कर्ज देणाऱ्या अवैध सावकारांनी कोट्यवधीची जमीन बळकावल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. आरोपींमध्ये राकेश डेकाटे (वय ४०, रा. स्नेहनगर), मुकेश डेकाटे, नरेश ठाकरे, महेश अरविंद साबळे व मदन चंद्रकांत काळे (६२) यांचा समोवश आहे.
फिर्यादी मोहन दाणी (६१, रा. अभ्यंकर रोड, विवेकानंदनगर) यांचे दाणी कन्स्ट्रक्शन व प्रॉपर्टी डेव्हलपर्सचे काम होते. त्यांनी मुलीला भेटण्यासाठी अमेरिकेला जाण्यासाठी डिसेंबर २०१० मध्ये काळे व साबळेकडून तिकिटासाठी १ लाख ३ हजार रुपये आणि २ लाख रुपये दहा टक्के व्याजदरावर घेतले होते. यापूर्वी सिमेंट कंपनीला देण्यासाठी दोन लाख रुपये आपल्या खात्यात जमा केले होते. त्यानंतर दाणी अमेरिकेला गेले. तेथून परतल्यावर आरोपींनी कर्ज परत करण्यास उशीर झाल्याचे कारण सांगून ८ लाख रुपये घेणे असल्याचे सांगितले. काळे व साबळे यांनी फिर्यादीच्या नावे राकेशकडून अनेक वेळा रक्कम घेतली होती. त्यामुळेच, दाणी यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला. आरोपी राकेश डेकाटे याने कर्जवसुलीसाठी फिर्यादी दाणी यांची हिंगणा येथील कोट्यवधी रुपये किमतीची ७.८ हेक्टर जमीन आपला भाऊ मुकेश डेकाटे याच्या नावे करवून घेतली. त्यानंतर सर्व आरोपी पुणे येथे पोहोचून बिल्डर दाणी यांना कर्जाची रक्कम परत करण्यासाठी धमकावू लागले. आरोपींनी दाणी यांना वर्धा येथील जमिनीचे कागदपत्रेही मागितली होती. काही वर्षापूर्वी दाणी नागपूरला आले असता अभ्यंकर रोडवरून आरोपींनी त्यांचे अपहरण करून घाट रोड येथील कार्यालयात त्यांना ओलिस ठेवण्यात आले होते. तेथे दाणी यांना मारझोड करून त्यांच्या घराची कागदपत्रे मागवून ५० कोऱ्या स्टॅम्पवर जबरी स्वाक्षरी करवून घेतली होती.