यवतमाळ नागरी सहकारी बँकेत कोट्यवधीचा गैरव्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 23:09 IST2018-03-05T23:07:49+5:302018-03-05T23:09:08+5:30
पदाधिकारी, कर्मचारी व अन्य आरोपींनी संगनमत करून यवतमाळ नागरी सहकारी बँकेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला, असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल रिट याचिकेत करण्यात आला आहे.

यवतमाळ नागरी सहकारी बँकेत कोट्यवधीचा गैरव्यवहार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पदाधिकारी, कर्मचारी व अन्य आरोपींनी संगनमत करून यवतमाळ नागरी सहकारी बँकेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला, असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल रिट याचिकेत करण्यात आला आहे.
व्यावसायिक विनोद कुच्चेवार यांनी ही याचिका दाखल केली आहे. आरोपींनी स्वाक्षऱ्या व कागदपत्रांत फेरफार करून विविध कर्ज योजनांतर्गत वेगवेगळ्या नावांनी कोट्यवधी रुपये उचलले. त्यानंतर कर्जाची रक्कम बँकेला परत केली नाही. यासंदर्भात सहकार विभागाकडे व वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती, पण कोणीच या गैरव्यवहाराची गंभीर दखल घेतली नाही. गैरव्यवहार करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात यावा व दोषी व्यक्तींचा शोध घेण्यासाठी प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांनी सोमवारी गृह विभागाचे सचिव, सहकार विभागाचे सचिव, यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून, यावर चार आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. एस. जी. जगताप व अॅड. एस. एस. गोडबोले यांनी कामकाज पाहिले.