शहरातील ४०० च्यावर झाडांवर संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:08 IST2021-03-15T04:08:32+5:302021-03-15T04:08:32+5:30
नागपूर : केंद्रीय मंत्र्यांच्या घाेषणेने अजनी आयएमएसच्या कचाट्यातून वाचलेली राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) तीन झाडे शेवटी महामेट्राेच्या ...

शहरातील ४०० च्यावर झाडांवर संकट
नागपूर : केंद्रीय मंत्र्यांच्या घाेषणेने अजनी आयएमएसच्या कचाट्यातून वाचलेली राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) तीन झाडे शेवटी महामेट्राेच्या कुऱ्हाडीत सापडलीच. मेट्राे रेल्वे प्रकल्पांतर्गत अजनी स्टेशनच्या पार्किंगच्या बांधकामास बाधा ठरत असल्याचे कारण देत नीरीतील २४९ झाडांना कापण्याची परवानगी महामेट्राेने महापालिकेच्या उद्यान विभागाकडे मागितली आहे. विभागाने परवानगी देण्यापूर्वी आक्षेप मागितले आहेत. मात्र आक्षेप घेण्यासाठी नीरी समाेर येईल का, हा प्रश्न आहे.
शहरात बांधकाम करणाऱ्या विविध संस्था आणि नागरिकांनी महापालिकेकडे वृक्षताेडीची परवानगी मागितली आहे. अशाप्रकारे ४०९ झाडांना कापण्याची तयारी चालली असून महापालिकेने रीतसर जाहिरात देऊन वृक्षताेड करण्यापूर्वी आक्षेप मागविले आहेत. यामध्ये नीरीतील २४९ झाडांसह महामेट्राेने फुटाळा तलावाशेजारील झाडांना ताेडण्यासाठी परवानगी मागितली आहे. पाईल अलायमेंटच्या कामात बाधा ठरत असल्याचे कारण देत १२१ झाडे ताेडण्यासाठी महामेट्राेने उद्यान विभागाकडे परवानगी मागितली आहे. उल्लेखनीय म्हणजे पार्किंग प्लाझाच्या बांधकामासाठी महामेट्राेने आधीच फुटाळा तलावाजवळील अनेक झाडे विनापरवानगी कापली आहेत.
याशिवाय इतवारी रेल्वे स्टेशन ते दिघाेरी रेल्वे स्टेशनपर्यंतच्या नवीन रेल्वे ट्रॅक लाईनच्या कामासाठी १५ झाडे ताेडण्याची परवानगी संबंधित कंत्राटदाराने मागितली आहे. बुधवार बाजार, केळीबाग राेड, महाल येथील प्रस्तावित वाणिज्य संकुलाच्या बांधकामासाठी ११ झाडे कापण्यासाठी महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी अर्ज सादर केला आहे. याशिवाय तालुका कृषी अधिकारी कार्यालय परिसरात असलेली धाेकादायक झाडे आणि काही नागरिकांनी वैयक्तिक रुपाने झाडे कापण्याची परवानगी मागितली आहे.