गुन्हेगारांचा कर्दनकाळ मेंढपाळांचा तारणहार
By Admin | Updated: July 20, 2014 01:14 IST2014-07-20T01:14:50+5:302014-07-20T01:14:50+5:30
धोतर आणि लोकरीचे शर्ट, डोक्यावर फेटा, पायात बूट, खांद्यावर घोंगडी, हातात काठी, कपाळभर मळवट, दाढी आणि जटा वाढलेली व्यक्ती कुणालाही संन्यासीच वाटेल. परंतु दिसते तसे नसते हेच खरे.

गुन्हेगारांचा कर्दनकाळ मेंढपाळांचा तारणहार
सेवानिवृत्तीनंतर समाजसेवा : नारायण मोठेदेसाई यांचा तरुणाईपुढे आदर्श
रूपेश उत्तरवार - यवतमाळ
धोतर आणि लोकरीचे शर्ट, डोक्यावर फेटा, पायात बूट, खांद्यावर घोंगडी, हातात काठी, कपाळभर मळवट, दाढी आणि जटा वाढलेली व्यक्ती कुणालाही संन्यासीच वाटेल. परंतु दिसते तसे नसते हेच खरे. असाच पेहराव करणारी ही व्यक्ती आहे, पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झालेले पोलीस उपअधीक्षक नारायण खाणू मोठेदेसाई.
सेवानिवृत्तीनंतर धनगर समाजाच्या विकासाचे व्रत घेतलेले नारायणराव मेंढपाळांच्या चराईचा प्रश्न सोडविण्यासाठी रानोमाळ पालथा घालत आहेत. वयाची सत्तरी गाठली तरी ते अविरत कार्यरत आहेत. तरुणांना लाजविणारा त्यांचा उत्साह बघितल्यानंतर आश्चर्याने बोटे तोंडात गेल्याशिवाय राहत नाही. नोकरीत असताना गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेले मोठेदेसाई आता मेंढपाळांचे तारणहार झाले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील मेंढ्यांचा चराईचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर शेकडो मेंढपाळ मुख्य वनसंरक्षकाच्या कार्यालयावर धडकले. मात्र न्याय मिळत नव्हता. शेवटी ही बाब नारायण मोठेदेसाई यांना माहीत झाली आणि ते यवतमाळात दाखल झाले.
मेंढी चराईच्या प्रश्नावर त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टाणकोडोली हे त्यांचे जन्मगाव. पोलीस उपअधीक्षक म्हणून ३७ वर्षे सेवा केली. त्यावेळी त्यांच्या बुलेटच्या आवाजाने गुन्हेगार थरथर कापायचे. दारु विक्रेते तर अक्षरश: पळून जायचे. यातूनच त्यांनी अनेक गावात दारूबंदी केली. अनेक गुन्हेगारांना वठणीवर आणले. पोलिसातही त्यांचा दरारा होता. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर कोणताही बडेजाव न ठेवता समाजाचे प्रश्न सोडविण्याचे व्रत त्यांनी हाती घेतले.
मेंढपाळ अन्याय निवारण समितीची स्थापना केली. आज ते मेंढपाळांसाठी विठ्ठल पुजारी म्हणून काम करतात. मेंढपाळांचा प्रश्न सोडविण्यासाठी ते पोटतिडिकेने भटकंती करतात.
मेंढपाळांना सामूहिक निवारा मिळावा, वन जमीन द्यावी, मेंढी चराईसाठी आकारण्यात येणारा कर रद्द करावा, मेंढपाळांच्या मुलांसाठी वस्तीशाळा सुरू करावी, मेंढपाळ बेड्यावर पशुवैद्यकीय सेवा मोफत देण्यात यावी, लोकर साठविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात गोदाम बांधावे, असे अनेक प्रश्न घेऊन ते शासन दरबारी लढा देत आहेत. मेंढपाळ बांधवांना आपल्या समस्यांबाबत लढण्यासाठी जागृत करीत आहेत.