गुन्हेगारांचा हल्लाबोल !
By Admin | Updated: July 9, 2014 01:06 IST2014-07-09T01:06:57+5:302014-07-09T01:06:57+5:30
गुन्हेगारीला आळा घालण्याच्या शहर पोलीस दलाच्या उपाययोजनांची वाट लावत गुन्हेगारांनी हल्लाबोल सुरूच ठेवला आहे.

गुन्हेगारांचा हल्लाबोल !
दोन फूल, दोन हाफ मर्डर : हुडकेश्वर, अजनीतील घटना
नागपूर : गुन्हेगारीला आळा घालण्याच्या शहर पोलीस दलाच्या उपाययोजनांची वाट लावत गुन्हेगारांनी हल्लाबोल सुरूच ठेवला आहे.
सोमवारी हुडकेश्वरमध्ये पाऊणतासात दोन खुनाच्या घटना घडल्या. तर, एकाच्या खुनाचा प्रयत्न झाला. अजनीतही एकावर प्राणघातक हल्ला झाला.
उंबरगाव (कुही) येथील दिलीप दुधराम खंगार (वय २७) याचा विजय मोहोड (वय २०, रा. नरसाळा) आणि सचिन मानकर (वय १९, रा. उमरगाव) या दोघांनी चाकूचे घाव घालून खून केला. नरसाळा येथील पाण्याच्या टाकीजवळ सोमवारी रात्री ९ वाजता ही थरारक घटना घडली.
या घटनेपूर्वी दिलीप, आरोपी विजय, सचिन तसेच त्यांचे दोन मित्र असे पाच जण स्रेहल बियर बारमध्ये दारू पित बसले होते. तेथे जुन्या वादातून त्यांच्यात बाचाबाची झाली. दिलीपने यावेळी विजय आणि सचिनला धमकी दिली. दिलीप सनकी स्वभावाचा असल्यामुळे त्याची कशीबशी समजूत काढत हे सर्व बाहेर आले. दोन मित्र निघून गेले. तर, दिलीपचा काटा काढण्याच्या इराद्याने विजय आणि सचिनने त्याला नरसाळ्यात आणले. विजय धावतच घरी गेला. त्याने घरातून चाकू आणून दिलीपवर सपासप घाव घातले. आरडाओरडीमुळे गाव जमा झाला. ते पाहून आरोपी पळून गेले. माहिती कळताच हुडकेश्वरचे पीआय ज्ञानेश्वर मुंढे, एपीआय विशाल जयस्वाल आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. दिलीपचे वडील दुधराम कोंडबा खंगार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.
या घटनेचा पंचनामा सुरू असतानाच तिकडे बाजूच्या बेलतरोडी बाजारात आनंद वामनराव बावनकर (वय २७) या तरुणाचा भीषण खून झाला. आनंद आॅटो चालवायचा. एसबीआयच्या एटीएमसमोर तिघांनी त्याचा खून केल्याची चर्चा आहे. मात्र, कुणीही आरोपीबाबतची माहिती पोलिसांना दिली नाही. एटीएमचे सीसीटीव्ही कॅमेरेही पोलिसांनी तपासले.
खुनाचा आरोपी बीएचा स्टुडंट
दिलीपच्या खुनाच्या १२ तासातच हुडकेश्वर पोलिसांनी दोन्ही आरोपींना हुडकून त्यांना अटक केली. मृत दिलीप विमानतळावर खासगी टॅक्सी चालवायचा तर, आरोपी विजय मोहोड हासुद्धा खासगी वाहनचालक आहे. आरोपी सचिन मानकर महाविद्यालयीन (बीए प्रथम वर्ष) विद्यार्थी आहे. त्याचे वडील प्रॉपर्टी डीलिंग करतात तर, आई ग्रामपंचायत सदस्य आहे. सचिन खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात अडकल्याने त्याच्या कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे. दारूच्या नशेत दिलीप नेहमी धमकावत असल्यामुळे विजय आणि सचिनने त्याला कायमचे संपविले.