खुनाचा बदला घेण्यासाठी गुन्हेगारावर हल्ला
By Admin | Updated: January 12, 2017 01:44 IST2017-01-12T01:44:27+5:302017-01-12T01:44:27+5:30
शांतिनगर येथील अनवर ऊर्फ चांदी हत्याकांडात सहभागी असलेला गुन्हेगार सय्यद अयाज अलीवर मंगळवारी रात्री हल्ला करण्यात आला.

खुनाचा बदला घेण्यासाठी गुन्हेगारावर हल्ला
शांतिनगरात गँगवारची शक्यता : पोलिसांच्या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये दहशत
नागपूर : शांतिनगर येथील अनवर ऊर्फ चांदी हत्याकांडात सहभागी असलेला गुन्हेगार सय्यद अयाज अलीवर मंगळवारी रात्री हल्ला करण्यात आला. अनवरच्या खुनाने संतापलेला त्याचा भाऊ अकबर याने साथीदाराच्या मदतीने हा हल्ला केला. अनवरनंतर आपलाही खून होण्याच्या भीतीने अकबरने हा हल्ला केल्याची चर्चा आहे. या घटनेनंतर शांतिनगर परिसरात गँगवार भडकण्याची शक्यता बळावली आहे.
अनवर ऊर्फ चांदी याचा सव्वा वर्षांपूर्वी अपहरण करून खून करण्यात आला होता. चांदीच्या खुनाला सुरुवातीला पोलिसांनी गांभीर्याने घेतले नाही. त्यांनी गुन्हासुद्धा दाखल केला नव्हता. प्रकरण अंगावर शेकल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शांतिनगर परिसरातील कुख्यात गुंड वसीम ऊर्फ चिऱ्याने अयाज व इतर साथीदारांच्या मदतीने चांदीचा खून केला होता. तसेच मृतदेह कामठीतील कालव्यात फेकला होता. या खुनाचा मुख्य सूत्रधार वसीम अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तर अयाज आणि इतर आरोपी दीड महिन्यांपूर्वीच जामिनावर सुटले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चांदी हत्याकांडातील आरोपी अनेक दिवसांपासून अकबरला धमकावीत आहेत. अनवरनंतर त्याचाही खून करण्यात येणार असल्याचे सांगून ते लोकांमध्ये दहशत निर्माण करीत आहेत. यामुळे अकबर संतापला होता. त्यामुळेच त्याने भावाच्या खुनाचा बदला घेऊन अयाजला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी रात्री ९.३० वाजता अय्याज शांतिनगरमध्ये बसला होता. अकबर आपल्या साथीदारांसोबत तिथे आला. येताच ‘तू माझ्या भावचा खून का केला’ असे विचारीत धमकावू लागला तसेच मारहाण केली. पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. अयाजने शांतिनगर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दंगा व मारहाणीचा गुन्हा दाखल करीत अकबर व त्याच्या साथीदारांना अटक केली.
या घटनेनंतर शांतिनगर परिसरात दहशत पसरली आहे. अकबर आॅटोचालक आहे. त्याच्या साथीदारांचे म्हणणे आहे की, पोलीस अकबर व त्याच्या नातेवाईकांना त्रास देत आहे. अयाज आणि अनवर हत्याकांडातील आरोपी काही दिवसांपासून लोकांना धमकावित आहेत. चांदीच्या खुनाचा मुख्य आरोपी वसीम याला पकडण्यासाठी पोलिसांनी कुठलेही प्रयत्न केले नाही. पोलिसांनी याबाबत उदासीन धोरण अवलंबिले आहे.(प्रतिनिधी)
गुन्हेगारांना मिळत
आहे आश्रय
सूत्रांनुसार चांदी हत्याकांडातील आरोपींना पोलिसांचा आश्रय मिळाला आहे. जामिनावरून आल्यापासून आरोपी लोकांमध्ये दहशत पसरवित असल्याची माहिती पोलिसांनाही आहे. त्यानंतरही पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही. यामुळे ताजी घटना घडली.