शिवसेनेविरोधात बोलतात म्हणून शेलारांविरोधात गुन्हा; देवेंद्र फडणवीसांची शंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 19:32 IST2021-12-09T19:31:32+5:302021-12-09T19:32:15+5:30
Nagpur News मुंबईचे भाजप आमदार आशिष शेलार यांच्यावर मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकारण तापले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात शिवसेनेच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे.

शिवसेनेविरोधात बोलतात म्हणून शेलारांविरोधात गुन्हा; देवेंद्र फडणवीसांची शंका
नागपूरः मुंबईचे भाजप आमदार आशिष शेलार यांच्यावर मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकारण तापले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात शिवसेनेच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे. भाजपचा कुठलाही नेता महिलांबाबत अभद्र बोलूच शकत नाही; परंतु शेलार हे शिवसेनेविरोधात आक्रमक बोलतात. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा तर दाखल करण्यात आलेला नाही ना, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गुरुवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भाजपचा कोणताही नेता आणि विशेषतः आशिष शेलार हे कोणत्याही महिलेबद्दल अभद्र किंवा चुकीचा शब्द वापरू शकत नाहीत. महापौरांबद्दल तर अजिबात नाही. काल त्यांची पत्रकार परिषद किंवा पत्रक याचा चुकीचा अर्थ काढून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष शेलार शिवसेनेविरोधात आक्रमकतेने बोलतात म्हणून त्यांना शांत करण्यासाठी कदाचित गुन्हा दाखल झाला का हा देखील एक प्रश्न आहे, अशी शंका देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केली आहे.
काही मुद्द्यांवर राजकारण नको
तमिळनाडू येथील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे निधन झाले. या दुर्घटनेवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शंका व्यक्त केली होती. त्यावर विचारणा केली आता काही बाबतीत राजकारणापासून दूर राहिले पाहिजे, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली. जिथे सीडीएस यांचा विषय आहे तेथे अशी वक्तव्य देणे योग्य नाही. तिन्ही सैन्यदलांची विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या चौकशीतून सत्य समोर येईपर्यंत त्यावर बोलणे अनुचित आहे, असे फडणवीस म्हणाले.