विनयभंगाचा गुन्हा अतिशय गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:07 IST2020-12-25T04:07:30+5:302020-12-25T04:07:30+5:30
नागपूर : विनयभंगाचा गुन्हा अतिशय गंभीर आहे. त्यामुळे हा गुन्हा करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे असे निरीक्षण ...

विनयभंगाचा गुन्हा अतिशय गंभीर
नागपूर : विनयभंगाचा गुन्हा अतिशय गंभीर आहे. त्यामुळे हा गुन्हा करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय जोशी यांनी एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवले. तसेच, संबंधित प्रकरणातील आरोपीला दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
दिनेश ऊर्फ नितीन उकंडराव खंडाते (२४) असे आरोपीचे नाव असून तो ममदापूर, ता. आष्टी, जि. वर्धा येथील रहिवासी आहे. आरोपीला महिलेचा सन्मान व पावित्र्याची जाणिव नाही. त्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून अतिशय गंभीर स्वरुपाचे कृत्य केले. त्याला साध्या स्वरूपाची शिक्षा सुनावल्यास मुली सुरक्षित नसल्याचा आणि न्यायालये अशी प्रकरणे गंभीरतेने घेत नाही असा संदेश समाजामध्ये जाईल. त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींपर्यंत कठोर संदेश जाण्यासाठी व आरोपीला धडा शिकविण्यासाठी कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे असेही न्यायालयाने हा निर्णय देताना नमूद केले.
घटनेच्या वेळी पीडित मुलगी १५ वर्षे वयाची होती. १६ एप्रिल २०१५ रोजी गावात निघालेल्या धार्मिक मिरवणुकीत ती सहभागी झाली होती. दरम्यान, आरोपीने तिचा विनयभंग केला. ३ जानेवारी २०२० रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला ३ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने ते अपील अंशत: मंजूर केले व आरोपी तरुण वयातील असल्याने त्याला दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, या गुन्ह्यासंदर्भात वरीलप्रमाणे निरीक्षण नोंदवून आरोपीला यापेक्षा कमी शिक्षा देता येणार नसल्याचे स्पष्ट केले.