चित्रांश टेक्नॉलॉजी संचालकासह पाच जणांवर गुन्हे दाखल
By Admin | Updated: March 24, 2015 02:21 IST2015-03-24T02:21:03+5:302015-03-24T02:21:03+5:30
हजारो लोकांची फसवणूक करणाऱ्या चित्रांश टेक्नॉलॉजी कंपनीच्या संचालकांसह सदर

चित्रांश टेक्नॉलॉजी संचालकासह पाच जणांवर गुन्हे दाखल
सहपोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर कारवाई
नागपूर : हजारो लोकांची फसवणूक करणाऱ्या चित्रांश टेक्नॉलॉजी कंपनीच्या संचालकांसह सदर पोलिसांनी पाच जणांवर अखेर गुन्हा दाखल केला.
गुंतवणूकदारांना एक टीव्ही द्यायचा. टीव्हीवर विविध जाहिराती दाखविण्याच्या बदल्यात पहिल्या सहा महिन्यात प्रति महिना सात हजार रुपये, त्यानंतरच्या सहा महिन्यात दर महिन्याला आठ हजार आणि २४ महिन्यांपर्यंत १० हजार रुपये देण्याचा गुंतवणूकदारांसोबत करार करायचा आणि त्याच्याकडून प्रारंभी ३५ हजार रुपये घ्यायचे, अशी चित्रांशच्या संचालकांची कार्यपद्धत होती. त्याला उपराजधानीतील हजारो गुंतवणूकदार फशी पडले. त्यांनी चित्रांशच्या संचालकांना ३५ हजार रुपये दिले. पहिल्या दोन महिन्यात चेकने रक्कम दिल्यानंतर तिसऱ्या महिन्यातच अनेकांचे चेक बाऊन्स झाले. त्यामुळे संबंधितांनी चित्रांशच्या श्रीराम टॉवर, सदरमधील कार्यालयात धाव घेतली. त्यावेळी पीडितांना वेगवेगळे कारण सांगून शांत करण्यात आले. मात्र रक्कम मिळण्याऐवजी केवळ आश्वासनेच दिली जात असल्याचे पाहून २०० वर गुंतवणूकदारांनी १६ मार्चला कार्यालयात ‘हल्लाबोल‘ केला. सदर पोलीस ठाण्यात तक्रारही दिली. मात्र, पोलिसांनी तातडीने कारवाई केली नाही. परिणामी हवालदिल पीडितांनी परिमंडळ २ च्या उपायुक्तांकडे धाव घेतली. त्यांनीही दखल घेतली नाही. त्यामुळे शुक्रवारी ५० वर पीडितांनी सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंह यांची भेट घेऊन चित्रांशचे एमडी सुधींद्रमोहन माथूर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर चौकशीची चक्रे फिरली. सदर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ५.२० वाजता चित्रांशचा सर्वेसर्वा एस. एम. माथूर, कंपनीचा महाव्यस्थापक, टीव्ही वितरक, एजंट तसेच योगेश आणि अमित नामक तरुणासह पाच जणांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. (प्रतिनिधी)