रविराज इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या संचालकावर गुन्हे
By Admin | Updated: July 9, 2014 00:57 IST2014-07-09T00:57:04+5:302014-07-09T00:57:04+5:30
अल्पावधीत दुप्पट-तिप्पट परतावा मिळवून देण्याचा दावा करून शेकडो गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या रविराज इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या संचालकासह नऊ जणांविरुद्ध अखेर धंतोली

रविराज इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या संचालकावर गुन्हे
धंतोलीत नोंद : जोशी दाम्पत्य, नातलगांसह नऊ आरोपी
नागपूर : अल्पावधीत दुप्पट-तिप्पट परतावा मिळवून देण्याचा दावा करून शेकडो गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या रविराज इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या संचालकासह नऊ जणांविरुद्ध अखेर धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
लोकमतने सर्वप्रथम २७ जून आणि त्यानंतर अनेकदा ठळकपणे वृत्त प्रकाशित करून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या रविराज इन्व्हेस्टमेंट कंपनीची बनवाबनवी उघड केली होती. ही कंपनी गाशा गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचेही वृत्तात नमूद केले होते.
आरोपी राजेश सुरेश जोशी, त्याची पत्नी राधा तसेच शरद जोशी, सुरेखा जोशी, सरिता जोशी यांनी देवनगरातील कौस्तुभ बंगल्यात कंपनीचे कार्यालय जानेवारी २०१० मध्ये थाटले. आपल्या एजंटच्या माध्यमातून त्यांनी अल्पावधीत दुप्पट-तिप्पट परतावा मिळेल, असा दावा करून अनेकांना लाखोंच्या ठेवी गुंतविण्यास बाध्य केले. मात्र, नियोजित अवधीत ठेवीदारांना रक्कम मिळाली नसल्यामुळे ठेवीदार अस्वस्थ झाले. जोशी अॅन्ड कंपनीने कार्यालयाची इमारत विकून गाशा गुंडाळल्याचे लक्षात आल्यानंतर, पंकज महाजन तसेच विजय वामन मराठे (वय ४८, रा. विकासनगर) यांनी २६ जूनला धंतोली ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरण लाखोंच्या फसवणुकीचे असल्यामुळे त्याचा तपास गुन्हे शाखेकडे गेला. प्राथमिक तपास केल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आरोपी राजेश सुरेश जोशी, त्याची पत्नी राधा, शरद जोशी, सुरेखा जोशी, सरिता जोशी तसेच त्यांचे चार एजंट असे नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
आरोपी फरार
आरोपी फरार आहेत. पुराव्याची साखळी जमविण्यासाठी तपासाला वेळ लागतो, असा पोलिसांचा युक्तिवाद आहे. त्यामुळेच गुन्हे दाखल होऊन दोन महिने झाले, मात्र, वासनकर समूहाचा प्रशांत वासनकर आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केलेली नाही. पोलीस यांना अटकपूर्व जामीन मिळावा, याची वाट बघताहेत की काय, असा संतप्त प्रश्न पीडित गुंतवणूकदार विचारत आहेत. (प्रतिनिधी)