क्राईम ब्रांचने वर्षभरात पकडले १६१२ गुन्हेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:07 IST2021-01-09T04:07:08+5:302021-01-09T04:07:08+5:30

- उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहर पोलिसातील गुन्हे शाखेने गेल्या वर्षभरात १६१२ गुन्हेगांरांना बेड्या ठोकून ...

Crime Branch caught 1612 criminals during the year | क्राईम ब्रांचने वर्षभरात पकडले १६१२ गुन्हेगार

क्राईम ब्रांचने वर्षभरात पकडले १६१२ गुन्हेगार

- उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहर पोलिसातील गुन्हे शाखेने गेल्या वर्षभरात १६१२ गुन्हेगांरांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून ७ कोटी ५६ लाख ३१ हजार रुपयाचे साहित्य जप्त केले होते. या काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुन्हे शाखेचे डीसीपी गजानन राजमाने यांनी सन्मानित केले.

गुन्हे शाखेच्या युनिट दोन व चारने सर्वाधिक प्रकरणांचा निपटारा केला. युनिट एकने शस्त्र निरोधक कायद्यान्वये सर्वाधिक कारवाई केली. एसएसबीने देहव्यापारातील १४ अड्ड्यांचा पर्दाफाश केला. एनडीपीएस सेलने ४४ प्रकरणात कारवाई करत ७० आरोपींना बेड्या ठोकल्या. वाहन चोरी दलाने ३० प्रकरणांचा निपटारा केला. २०१९ मध्ये चेन स्नेचिंगच्या ६४ प्रकरणांची नोंद झाली होती. चेन स्नेचिंग दलाच्या प्रयत्नाने गेल्या वर्षी २० प्रकरणांची नोंद झाली. त्यातील १२ प्रकरणांचा छडा लावण्यात आला. चेन स्नेचिंग दलाने इराणी टोळीच्या विरोधात मकोका कारवाई केली. क्राईम ब्रांचला अनेक प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सायबर सेलचेही कौतुक करण्यात आले.

याप्रसंगी युनिट एकचे पीआय विजय तलवारे, युनिट दोनचे किशोर पर्वते, युनिट तीनचे विनोद चौधरी, युनिट चारचे अशोक मेश्राम, युनिट पाचचे विनोद पाटील, विशेष दलाचे गजानन कल्याणकर, सेंधमारी दलाचे एपीआय प्रशांत अन्नछत्रे, वाहन चोरी विरोधक दलाचे पीएसआय मयूर चौरसिया, चेन स्नेचिंग विरोधी दलाचे हेमंत थोरात, सायबर सेलचे बलराम झाडोकर, शिपाई सुहास शिंगणे, सूरज भोंगाडे, आशिष पाटील, एसएसबीच्या पीआय तृप्ती सोनवणे, एनडीपीएस सेलचे सार्थक नेहेते, एमपीडीए सेलचे राजू बहादूरे, एएसआय संदीप शर्मा, एमओबीचे पीएसआय राजेश नाईक, एएसआय प्रभाकर नांदे व भरोसा सेलच्या पीआय ज्योती वानखेडे यांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यासोबतच मकोका अंतर्गत सहा प्रकरणांचा तपास करत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याचा रेकॉर्ड स्थापित करणारे एसीपी सुधीर नंदनवार यांचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करण्यात आले. डीजी पोलीस मेडलने सन्मानित हवालदार सुनील ठवकर यांनाही पदक देऊन सन्मानित करण्यात आले. कोरोना संक्रमणामुळे ठवकर उपस्थित राहू शकले नाही.

आणखी सजग राहू

या प्रसंगी गुन्हे शाखेचे डीसीपी गजानन राजमाने यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याची प्रशंसा केली. नागपूर पोलीस आयुक्तांच्या क्षेत्रात शिक्षेचा दर ६७ टक्के आहे. यात क्राईम ब्रांचचे योगदान महत्त्वाचे आहे. गंभीर प्रकरणांचा निपटारा करण्यासोबतच गुन्हा रोखण्यासाठीची भूमिका महत्त्वाची आहे. २०२१मध्ये गुन्हे शाखेला आधीपेक्षा अधिक सजग करू, असे ते म्हणाले.

Web Title: Crime Branch caught 1612 criminals during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.