अतिक्रमणास संरक्षण अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: April 8, 2016 02:38 IST2016-04-08T02:38:34+5:302016-04-08T02:38:34+5:30
एका डॉक्टरने केलेल्या अतिक्रमणाला संरक्षण दिल्यावरून दुसरे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस.आर. अग्रवाल यांच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून....

अतिक्रमणास संरक्षण अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
मनपा इतिहासातील पहिलीच घटना : फौजदारी तक्रारीची न्यायालयाने घेतली दखल
नागपूर : एका डॉक्टरने केलेल्या अतिक्रमणाला संरक्षण दिल्यावरून दुसरे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस.आर. अग्रवाल यांच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून अंबाझरी पोलिसांनी मनपाच्या धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त राजेश शांताराम कराडे यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनपाच्या अलीकडच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. न्यायालयाच्या या ऐतिहासिक आदेशामुळे जाणीवपूर्वक कर्तव्य न बजावणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्धही सामान्य माणूस न्यायालयाच्या माध्यमातून कारवाई करू शकतो, अशी नवी आशा पल्लवीत झाली आहे. राजेश कराडे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याच्या कलम ३९७ - ए (२) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यात तीन महिन्याहून अधिक शिक्षेचे आणि २० हजार रुपये दंडाचे प्रावधान आहे. गोकुळपेठ कॉर्पोरेशन मार्केट येथील रितेश राधेश्याम शर्मा यांनी दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीवरून न्यायालयाने हा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता.
प्रकरण असे की, शंकरनगर वेस्ट हायकोर्टवर पॅनोरामा एमआरआय सेंटरची इमारत आहे. नियमांचे उल्लंघन करून हे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. पार्किंगच्या जागेवर मोठा जनरेटर लावून ही जागा आणखी अरुंद करण्यात आलेली आहे. यावर डॉ. शिरीष धांदे यांना १४ मे २०१५ रोजी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमाच्या कलम ५५ अंतर्गत हे अतिक्रमण हटविण्यास फर्मावण्यात आले होते. कराडे यांनी अतिक्रमण हटवण्याची नोटीस दिली होती; परंतु अंमलबजावणी केली नव्हती. पुढे या अतिक्रमणाला संरक्षण दिले जात असल्याचे लक्षात येताच, रितेश शर्मा यांनी न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली होती. यावर न्यायालयाने अंबाझरी पोलिसांना या अतिक्रमणाबाबत सविस्तर अहवाल मागविला होता. तो न्यायालयात दाखल करण्यात आला होता. या अहवालावरून राजेश कराडेविरुद्ध प्रथमदर्शनी गुन्हा होत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास येताच, त्यांनी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले, तसेच राजेश कराडेविरुद्ध नोटीस जारी केली. न्यायालयात अर्जदाराच्या वतीने अॅड. मिलिंद चौरसिया यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)