क्रिकेट बुकी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:10 IST2021-03-04T04:10:57+5:302021-03-04T04:10:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अनेक वर्षांपासून क्रिकेट सट्टेबाजी करणारा बुकी राजेश प्रेमलाल बल्लारे याच्या सेमिनरी हिल्स, मानवसेवा ...

क्रिकेट बुकी जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेक वर्षांपासून क्रिकेट सट्टेबाजी करणारा बुकी राजेश प्रेमलाल बल्लारे याच्या सेमिनरी हिल्स, मानवसेवा नगरातील अड्ड्यावर छापा घालून पोलिसांनी त्याला तसेच त्याच्या दोन साथीदारांना अटक केली. त्यांच्याकडून चार लाख, ८६ हजारांची रोकड, मोबाईल तसेच कार असा एकूण ११ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती उपायुक्त विनीता साहू यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
अटक करण्यात आलेल्या बल्लारेच्या साथीदारांची नावे रूपेश दामोदर परसोडकर व त्याचा भाऊ आशिष दामोदर परसोडकर (रा. मानवसेवानगर) अशी आहेत. परसोडकर बंधू कल्याण मटका सट्टापट्टीची खायवाडी करीत असल्याची माहिती उपायुक्त विनीता शाहू यांना सोमवारी दुपारी मिळाली होती. त्यांनी त्यांच्या विशेष पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप चंदन, हेडकॉन्स्टेबल आदित्य यादव, राजेश सोनवाने, अमितकुमार सिंग, पराग फेबडे, आलिम खान आणि कल्याणी पराते यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, या पथकाने मानवसेवानगरमध्ये छापा टाकला. तेथे आशिष आणि रूपेशला ताब्यात घेतल्यानंतर या मटका अड्ड्याचा सूत्रधार राजेश बल्लारे असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे पोलिसांनी राजेश याच्या घरी छापा टाकला. तेव्हा बल्लारे हा क्रिकेट सामन्यावरही सट्ट्याची खायवाडी करीत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याच्याकडून ४ लाख ८६ हजारांची रोकड आणि कार तसेच मोबाईल जप्त केले.
----
बल्लारे जुनाच खेळाडू
आरोपी बल्लारे सट्ट्याचा जुना खेळाडू आहे. त्याच्याविरुद्ध कलम ३५४ सह एकूण १७ गुन्हे दाखल असून गेल्या वर्षी ४ वेळा त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याचे उपायुक्त साहू यांनी सांगितले. बल्लारेचा गुन्हेगारी अहवाल बघता त्याच्याविरुद्ध एमपीडीएचे प्रपोजल तयार करण्यात येणार असल्याचेही उपायुक्त साहू यांनी पत्रकारांना सांगितले.
----