सृष्टी आणखी एका विश्वविक्रमासाठी सज्ज
By Admin | Updated: October 7, 2015 03:19 IST2015-10-07T03:19:38+5:302015-10-07T03:19:38+5:30
गेल्यावर्षी लोएस्ट लिम्बो स्केटिंगमध्ये‘दहा मीटर्स’चा ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’ नोंदविणारी ११ वर्षांची सृष्टी शर्मा पुन्हा एकदा नव्या विश्वविक्रमासाठी सज्ज झाली आहे.

सृष्टी आणखी एका विश्वविक्रमासाठी सज्ज
लिम्बो स्केटिंग : उमरेडची ११ वर्षीय स्केटर आज साधणार ‘लक्ष्य’
नागपूर : गेल्यावर्षी लोएस्ट लिम्बो स्केटिंगमध्ये‘दहा मीटर्स’चा ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’ नोंदविणारी ११ वर्षांची सृष्टी शर्मा पुन्हा एकदा नव्या विश्वविक्रमासाठी सज्ज झाली आहे. यावेळी सृष्टीचे लक्ष्य २५ मीटर लांब अंतर आणि ते देखील १७ सेंटीमीटर बारमधून लिम्बो स्केटिंग करण्याचे असेल. सध्या २२.५ सेंटीमीटरची नोंद गिनीज बुकात आहे. हा विक्रम मागे टाकून नवा विक्रम स्वत:च्या नावे करण्याचा सृष्टीचा मानस आहे. शेकडो उपस्थितांच्या साक्षीने आज बुधवारी सकाळी ९.३० वाजता वर्धमाननगर येथील सेंटर पॉर्इंट शाळेच्या प्रांगणात सृष्टी विक्रमासाठी प्रयत्न करेल.
लोकमत समाचारचे प्रॉडक्ट हेड मतीन खान यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले,‘ लोकमत समूहाच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. उमरेडच्या वेकोलि खाण परिसरात वास्तव्यास असलेली सृष्टी लोकमतच्या संपर्कात आली होती. लोकमत समूहाने सामाजिक दायित्वाच्या भावनेतून सृष्टीसारख्या प्रतिभेला नवे व्यासपीठ मिळवून देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. मुलींच्या प्रगतीसाठी लोकमतने अनेक उपक्रमदेखील हाती घेतले आहेत. ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा यांनी सृष्टीच्या या उपक्रमाला चालना देण्यासाठी सुरुवातीपासून पुढाकार घेतला हे विशेष.’
सृष्टीचे वषील धर्मेंद्र शर्मा हे वेकोलिच्या उमरेड खाणीत ड्रायव्हर आहेत. सृष्टीमध्ये असलेल्या गुणांची ओळख होताच लोकमतने तिच्या प्रतिभेला चालना देण्याचा निर्धार केला. २३ आॅगस्ट २०१४ रोजी झांशी राणी चौकातील हिंदी मोरभवन सभागृहात भव्य कार्यक्रमात हजारो उपस्थितांपुढे सृष्टीने लोएस्ट लिम्बो स्केटिंगमध्ये दहा मीटर अंतर १६.५ सेंटीमीटर उंचीच्या बारमधून पूर्ण करीत डोळ्यांचे पारणे फेडले. तिची ही कामगिरी लंडन येथील गिनीज वर्ल्ड रेकॉर्डला पाठविण्यात आली. त्याला यश येऊन यंदा दहा मीटर अंतराचा १६.५ सेंटीमीटर उंच लोएस्ट लिम्बो स्केटिंगचा विश्व विक्रम सृष्टीच्या नावे नोंदला गेला.सृष्टीच्या या विक्रमाने नागपूरला देश विदेशात नवा लौकिक मिळाला. सृष्टीची आई गृहिणी आहे. तिचे कोच वडील धर्मेंद्र हेच असून राकेश शर्मा हे मार्गदर्शक आहेत.
मागच्या यशामुळे उत्साहित होऊन सृष्टीने २५ मीटर अंतर आणि ते देखील १७ सेंटीमीटर उंची असलेल्या बारमधून पूर्ण करण्याचा निर्धार केला होता. त्यादृष्टीने तिचा कठोर सराव देखील सुरू आहे.
या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी जास्तीतजास्त लोकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला सृष्टीसह वेकोलिच्या उमरेड एरियाचे नोडल आॅफिसर दिनेश चौरसिया तसेच सृष्टीचे आईवडील उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)