चेसीसअभावी खोळंबली एसटी बसची निर्मिती
By Admin | Updated: October 9, 2014 01:13 IST2014-10-09T01:13:01+5:302014-10-09T01:13:01+5:30
खासगी वाहतुकीचे आव्हान पेलण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने बसेसच्या आधुनिकीकरणावर भर दिला आहे. त्यासाठी नवीन बसेसची निर्मिती केली जात आहे. मात्र आता नवीन चेसीस तयार करणारे युनिट

चेसीसअभावी खोळंबली एसटी बसची निर्मिती
आगारांना प्रतीक्षा : अडीच हजार बसेस वेटिंगवर
रूपेश उत्तरवार - यवतमाळ
खासगी वाहतुकीचे आव्हान पेलण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने बसेसच्या आधुनिकीकरणावर भर दिला आहे. त्यासाठी नवीन बसेसची निर्मिती केली जात आहे. मात्र आता नवीन चेसीस तयार करणारे युनिट मागे पडले. त्यामुळे निर्मितीचे काम खोळंबले असून अडीच हजार एसटी बसेस वेटींगवर आहेत.
खासगी बसेस सोबत स्पर्धा करण्यासाठी महामंडळाने एसटी बसेसला नवीन लूक देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. वातानुकूलित आरामदायी बसेस महामंडळाच्या सेवेत दाखल होत आहेत. आता कमी डिझेल लागणारे इंजिन परिवहन महामंडळाने विकसित केले आहे. यामुळे प्रदूषणमुक्त आणि कमी डिझेल बसेस तयार करण्याचे काम सुरू आहे.
बसेस निर्मितीचे काम सुरू असतानाच चेसीस निर्मिती युनिट मागे पडले. यातून नागपूर, पुणे आणि औरंगाबाद मध्यवर्ती कार्यशाळेतील निर्मिती प्रभावित झाली. मध्यंतरी काही दिवस महामंडळाच्या नवीन बसेस तयार करण्याचे काम थांबले. आता हा प्रश्न निकाली निघाला आहे. मात्र या अडथळ्यामुळे डिसेंबरमध्ये एसटी बसेसचे उत्पादन रखडले.
महामंडळाच्या जुन्या बसेस भंगारात काढण्यात आल्या आहेत. अशा बसेसचा लिलावही झाला. सेवाकाळ संपलेल्या बसेस ऐवजी नवीन बसेसची मागणी प्रत्येक जिल्ह्यातून करण्यात आली आहे. राज्यातील विविध आगारांना अडीच हजार बसेस लागणार आहेत. या बसेस लवकर मिळाव्या म्हणून प्रत्येक विभाग प्रमुख प्रयत्नात आहेत. त्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. डिसेंबरमध्ये या बसेस महामंडळाच्या सेवेत दाखल होणार आहेत.