नव्याने डीपीआर तयार करा
By Admin | Updated: May 1, 2016 02:54 IST2016-05-01T02:54:48+5:302016-05-01T02:54:48+5:30
कुंवारा भिवसन हे पारशिवनी तालुक्यातील आदिवासी समाजाचे धार्मिक स्थळ असून, या स्थळाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी नव्याने डीपीआर...

नव्याने डीपीआर तयार करा
‘कुंवारा भिवसन’ धार्मिकस्थळ : पालकमंत्री बावनकुळे यांचे निर्देश
नागपूर : कुंवारा भिवसन हे पारशिवनी तालुक्यातील आदिवासी समाजाचे धार्मिक स्थळ असून, या स्थळाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी नव्याने डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पर्यटन विभागाला दिले.
तत्कालीन आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांना या भागाचा विकास आराखडा दिला होता. सप्टेंबर २०१४ मध्ये अडीच कोटींचा निधी या भागाच्या विकासासाठी शासनाने दिला, तो अजूनही खर्च झाला नाही. आता नव्याने डीपीआर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, कुंवारा भिवसन येथील मंदिर कमिटीला ही जागा त्यांना आपल्या ताब्यात हवी आहे. ही संपूर्ण जागा वन विभागाची असून, वन विभागाने ही जागा कमिटीला दिल्यानंतरच या जागेवर काम करता येईल किंवा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यासाठी नासुप्रने आणि वन विभागाने आराखडा तयार करावा व काम नासुप्र करेल. त्यानंतर या जागेची संपूर्ण देखभाल नासुप्र करेल. पण हा प्रस्ताव संस्थानच्या पदाधिकाऱ्यांना मान्य नव्हता. त्यामुळे आधी वन विभागाकडून जागा मिळवा त्यानंतर डीपीआरची अंमलबजावणी करणे शक्य होईल, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी बैठकीत सांगितले. दुसऱ्या बाजूने शासनाने दिलेल्या या निधीची कामे सुरू करण्याचा आग्रहही केला जात होता.
कुंवारा भिवसन हा परिसर मेट्रोरिजनमध्ये असल्यामुळे या परिसराचा विकास नासुप्रच करू शकते. या कामासाठी आदिवासी विकास विभाग निधी देऊ शकतो. सुमारे १५ लाखांवर भाविक दरवर्षी या स्थळाला भेट देतात. त्यामुळे या ठिकाणी मूलभूत सुविधा आवश्यक आहे. तसेच पर्यटनाच्या दृष्टीनेही या भागाचा विकास करण्याची संधी आहे. वन विभागाची जागा मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो वन विभागाला द्यावा, त्यानंतर डीपीआरवर निर्णय घेऊ, असेही पालकमंत्री म्हणाले.
या बैठकीला आमदार मल्लिकार्जुन रेड्डी व माजी आमदार अॅड. आशिष जयस्वाल व आदिवासी समाजाचे नागरिक उपस्थित होते.(प्रतिनिधी)