Create a new corporation for autorickshaw drivers | ऑटोरिक्षा चालकांसाठी नवीन महामंडळ निर्माण करा 

ऑटोरिक्षा चालकांसाठी नवीन महामंडळ निर्माण करा 

ठळक मुद्देसंविधान चौक : ऑटोचालकांचे पोलीस आयुक्त उपाध्याय यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑटोरिक्षा चालकांसाठी नवीन महामंडळ निर्माण करून ५ कोटी रुपये अनुदान मंजूर करीत कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आ. प्रकाश गजभिये यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑटोरिक्षा संघटनेतर्फे आ. प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात गुरुवारी संविधान चौक येथे विविध मागण्यांसाठी धरणे निदर्शने केली. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी स्वत: आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले व आंदोलकांशी चर्चाही केली. ऑटो रिक्षा चालकाने ऑटोमध्ये अल्टेशन पाटी लावल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येऊ नये. ऑटोरिक्षा चालकांवर सीसीटीव्ही. कॅमेऱ्याच्या माध्यमातून चालान कार्यवाही करण्यात येऊ नये. आंध्रप्रदेश राज्याप्रमाणे नागपुरातही ऑटोरिक्षावरील टॅक्स माफ करण्यात यावे. ऑटोरिक्षाचे इन्शुरन्स पूर्वी २ हजार रुपए होते तर आता ते १० हजार रुपये करण्यात आले, यामुळे ऑटोरिक्षा चालक आर्थिक संकटात सापडला आहे म्हणून ते पूर्वीप्रमाणे २ हजार रुपए करण्यात यावे. कौटुंबिक कार्यक्रमास ऑटोरिक्षा चालक रिक्षाने जात असल्यास त्यांच्यावर ड्रेस न घातल्याची कारवाई करण्यात येऊ नये आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऑटोरिक्षा चालक विभागाचे नागपूर शहराध्यक्ष अब्दुल साहिद, अब्दुल हफीज, रवि किरनाके, अब्दुल फरियाज, शेख रफीक, अमित खोत, शबाज खान, शेख आरीफ खान, आरीफ शेख, शेख आबीद, रेधन खान, सजद साटू, उमेश चीकीट, युगेश लोंडे, हरीश काका, शिवप्रसाद शाहू, शौकत पठान, सचिन कामळे, इमरान शेख, इरफान खान, शादब भाई, बबलू भाई, जावेद खान, असलम खान, अफसर खान, जगदीश प्रसारे, अभिनव गजभिये आदी उपस्थित होते.

Web Title: Create a new corporation for autorickshaw drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.