लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खिडकी (काउंटर) उघडल्याच्या काही वेळेतच 'रिजर्वेशन फुल्ल'चा मेसेज दाखवून प्रवाशांचा हिरमोड करणाऱ्या दलालांना आता ‘तात्काळ’वरही अटकाव करण्यासाठी रेल्वेने प्रयत्न चालविले आहेत. या पार्श्वभूमीवर, तात्काळचे तिकिट मागणाऱ्या प्रवाशांच्या मोबाईलवर रेल्वेची सिस्टम ऑटोमेटिक ओटीपी जनरेट करणार आहे.
रेल्वेचे कोणत्याही क्लासचे असो, कन्फर्म तिकिट मिळावे यासाठी प्रवासी अनेक दिवसांपूर्वीच रिजर्वेशन करण्यासाठी धडपड करतात. मात्र, प्रवासाच्या कितीही दिवसांपूर्वी प्रयत्न केले तरी अनेकांना कन्फर्म तिकिट मिळविण्यात यश येत नाही. कित्येक प्रवाशांना लांबलचक वेटिंगचा नंबर दिसतो. ते बघता अनेक जण दलालाच्या हातात प्रति प्रवासी ३०० ते ७०० रुपये कोंबून कन्फर्म तिकिट मिळवतात. दलालांकडून मात्र रेल्वे प्रवासाचे हमखास कन्फर्म तिकिट मिळते. असाच प्रकार अलीकडे तत्काळ तिकिटांच्या बाबतीतही होतो. रेल्वेच्या रिझर्वेशन सिस्टमला हाताशी धरून दलाल रोज लाखोंचे वारेन्यारे करतात. त्यामुळे प्रवाशांच्या पदरात नाराजी येते. प्रवास सुकर करण्यासाठी त्यांना दलालांच्या हातात जास्तीचे पैसे घालावे लागतात. अनेक वर्षांपासूनचा हा आरोप आहे. वेळोवेळी ठिकठिकाणी दलालांवर होणाऱ्या कारवाईतून या आरोपाची पुष्टीही झाली आहे. दरम्यान, कन्फर्म तिकिटाच्या सिस्टमला दलालाकडून पोखरल्या जात असल्याच्या तक्रारी रेल्वेच्या शिर्षस्थ अधिकाऱ्यांकडे नियमित होतात. या पार्श्वभूमीवर, शिर्षस्थ पातळीवरून कारवाईची पावलं उचलली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता कन्फर्म तिकिटांसाठी रांगेत उभे राहून गठ्ठा तिकिट काढणाऱ्या दलालांना चाप बसविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने व्यवस्था केली आहे. त्यानुसार, आता पीआरएस काउंटरवरून तत्काळ तिकीट मागणाऱ्या प्रवाशांच्या मोबाइल नंबरवर सिस्टमद्वारे ओपीटी जनरेट होणार आहे. या जनरेटेड ओटीपीच्या प्रमाणीकरणानंतरच तात्काळ तिकिट संबंधिताला उपलब्ध करून दिले जाणार आहे.
१५ जुलैपासून सुरूवातदक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वेच्या प्रशासनानुसार, त्यांच्या कार्यक्षेत्रात ही व्यवस्था १५ जुलैपासून कार्यान्वित केली जाणार आहे. या नवीन व्यवस्थेमुळे आपली माणसं तात्काळसाठी रांगेत घुसवून अनेक तिकिटा मिळवणाऱ्या दलालांना चाप बसण्याची आणि प्रवाशांना न्याय मिळण्याची अपेक्षा आहे.