कोविडकाळाने सर्व हिरावले.. पण 'त्याने' हिंमत राखली आणि आता कमावतोय महिना दीड लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 07:00 IST2022-01-01T07:00:00+5:302022-01-01T07:00:15+5:30
Nagpur News रामटेक तालुक्यातील सीतापूर (पवनी) या दुर्गम भागातील नरेंद्र खोब्रागडे याने कोविडकाळात साबण-पेस्ट आणि आयुर्वेदिक औैषधी विकून लाखो रुपयांचे उत्पन्न कमाविले आहे.

कोविडकाळाने सर्व हिरावले.. पण 'त्याने' हिंमत राखली आणि आता कमावतोय महिना दीड लाख
कैलास निघोट
नागपूर: कोविड काळात अनेकांचे रोजगार हिरावले. काहींनी आत्महत्येचा मार्गही पत्करला तर काहींनी परिस्थितीवर मात केली. रामटेक तालुक्यातील सीतापूर (पवनी) या दुर्गम भागातील नरेंद्र खोब्रागडे याने कोविडकाळात साबण-पेस्ट आणि आयुर्वेदिक औैषधी विकून लाखो रुपयांचे उत्पन्न कमाविले आहे.
नरेंद्रच्या वाट्याला सुरुवातीपासूनच संघर्ष आला. कॉलमचे खड्डे खोदण्याच्या कामापासून तर बारमध्ये वेटरचेही काम त्याने केले आहे. मात्र, इच्छाशक्तीच्या बळावर त्याने नेटवर्क मार्केटिंगचे काम करून पेस्ट-साबण विकून पैसा कमाविण्याचा संकल्प केला. त्यात तो यशस्वी झाला. लॉकडाऊन काळात त्याने १२ लाखांची कारही खरेदी केली.
नरेंद्रचा जन्म ४०० लोकवस्ती असलेल्या सितापूर (पवनी) येथे झाला. ते चौघे-बहीण भावंड होते. नरेंद्रचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. अभ्यासात तो हुशार होता. बारावीत चांगले गुण मिळाल्याने त्याने शिक्षक होण्याचे ठरविले. त्याने नगरधन येथे डी.एड्. केले. दिवसभर कॉलेज आणि रात्री बारमध्ये तो वेटरचे काम करायचा. त्यानंतर तो नागपुरात रोजगाराच्या शोधात आला. येथेही त्याच्या नशिबी मोलमजुरीच आली. याचकाळात त्याने संगणक प्रशिक्षण घेतले. काही पैसा गोळा करून तो २०१६ मध्ये सितापूर येथे परतला. गावात संगणक प्रशिक्षण इन्स्टिट्यूट सुरू केली. मात्र, ती अल्पवधीत बंद पडली. नरेंद्र कर्जबाजारी झाला. अशात त्याने २०१९ मध्ये डायरेक्ट सेलिंगचा व्यवसाय स्वीकारला. नेटवर्क मार्केटिंगचे काम सुरू केले. यश मिळेल की नाही याची पर्वा न करता तो काम करत राहिला. मात्र, कोविडकाळात त्याच्या या कामाला उभारी आली. जून २०२० पासून तो महिन्याकाठी दीड लाखांचे उत्पन्न कमावितो.
गरिबीत जन्मलो ही माझी चूक नाही. मात्र, गरिबीत मेलो तर हा माझा मूर्खपणा राहील, असे नेहमी वाटायचे. कोविडकाळात धंदे ठप्प केले. मात्र मी संघर्ष करत राहिलो. खेड्यापाड्यांत आयुर्वेदिक औषधी विकली. यात यश आले.
नरेंद्र खोब्रागडे,
सितापूर (पवनी) ता. रामटेक