काेराेना ‘सुपर स्प्रेडर’ला आवरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:09 IST2021-04-20T04:09:22+5:302021-04-20T04:09:22+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : सावनेर तालुक्यातील अन्य गावांसाेबतच खापा (ता. सावनेर) शहरातही काेराेना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. मात्र, ...

काेराेना ‘सुपर स्प्रेडर’ला आवरा
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : सावनेर तालुक्यातील अन्य गावांसाेबतच खापा (ता. सावनेर) शहरातही काेराेना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. मात्र, शहरात काही काेराेना संक्रमितांचा मुक्तसंचार सुरू असून, ते काेराेनाचे सुपर स्प्रेडर बनले आहेत. ही बाब अत्यंक घातक ठरत असून, स्थानिक नगर परिषद प्रशासनाला माहिती दिली आहे. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आराेप नागरिकांनी केला असून, या ‘सुपर स्प्रेडर’ला आळा घालण्याची मागणी केली जात आहे.
मागील काही दिवसात खापा शहर व परिसरातील काही गावांमध्ये काेराेना रुग्णांमध्ये माेठी वाढ झाली आहे. संक्रमण राेखण्यासाठी नागरिकांना शासनाने जाहीर केलेल्या काेराेना प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करावे, असे स्थानिक नगर परिषद प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन करण्यात आले. मात्र, नागरिक त्यांचा बेजबाबदारपणा साेडायला तयार नाहीत. त्यातच काही काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण त्यांच्या कुटुंबीयांच्या तसेच घराबाहेर पडून इतरांच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळे काेराेना रुग्णांमध्येही वाढ हाेत आहे.
ही बाब काही नागरिकांनी स्थानिक पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, पालिका प्रशासनाने त्या काेराेना रुग्णांना अद्यापही आळा घातला नाही, असा आराेप नागरिकांनी केला आहे. काेराेना रुग्णांचा मुक्तसंचार इतरांसाठी घातक ठरत असून, त्यांच्यावर कारवाई करून त्यांना आळा घालावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
...
काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांनी डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार गृहविलगीकरणात राहावे. त्यांनी कुठल्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये. ते घराबाहेर फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना नागपूर शहरातील सीसीसी सेंटरमध्ये पाठविण्यात येईल. ही महामारी आटाेक्यात आणण्यासाठी प्रशासन व नागरिकांनी संयुक्त लढणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.
- डाॅ. ऋचा धाबर्डे, मुख्याधिकारी,
नगर परिषद, खापा.