नागपुरात फसवणूक करणाऱ्या दाम्पत्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 23:50 IST2020-12-23T23:49:07+5:302020-12-23T23:50:51+5:30
Couple arrested for cheating, crime news शासकीय नोकरीचे आमिष दाखवून ३०.५० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दाम्पत्यासह तीन आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली.

नागपुरात फसवणूक करणाऱ्या दाम्पत्यास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय नोकरीचे आमिष दाखवून ३०.५० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दाम्पत्यासह तीन आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. लखन साहेबराव जाधव, उषा लखन जाधव रा. अंबेजोगाई, बीड आणि जितेंद्र साहेबराव जाधव ऊर्फ मेंडके रा. भोले पेट्रोल पंप चौक धरमपेठ अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपी हे बीएसएनएल व आरटीओमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून युवकांना आपल्या जाळ्यात ओढायचे. त्यांनी धरमपेठ येथील रहिवासी असलेल्या विशाल तायवाडे याच्यासह ८ बेरोजगारांना फसविले. त्यांना लिपिक व चपराशी म्हणून लावून देण्याचे आमिष दिले. विशालकडून ७ लाख रुपये व इतर पीडितांकडून २३.५० लाख रुपये घेतले. त्यांना बोगस नियुक्तिपत्र दिले. या नियुक्तिपत्रामुळे पीडितांना आरोपींवर विश्वास बसला. फसवणूक केल्यानंतर आरोपी फरार झाले.
विशाल तायवाडेच्या तक्रारीवर सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी काही दिवसांपासून झारखंडमधील धनबाद येथे लपून बसले होते. ते आपल्या राज्यात परत येतील, याची पोलीस वाट पाहत होते. यासाठी आर्थिक शाखेचे दोन पथक तयार करण्यात आले. एका पथकाला अंबेजोगाईला पाठवण्यात आले. तर दुसरे पथक नागपूरच्या निवासस्थावर लक्ष ठेवून होते. आरोपी राज्यात परतल्याचे माहीत होताच पथकाने आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून पीडितांचे दस्तऐवज जप्त करण्यात आले. आरोपींना २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे.