१० हजार वाघांना सांभाळण्यास देशातील जंगल सक्षम
By Admin | Updated: January 12, 2017 01:47 IST2017-01-12T01:47:21+5:302017-01-12T01:47:21+5:30
जगाच्या तुलनेत भारतात वाघांची स्थिती खूप चांगली आहे. नुकत्याच झालेल्या व्याघ्र गणनेनुसार आपल्या देशात सुमारे दोन हजार वाघ आहेत.

१० हजार वाघांना सांभाळण्यास देशातील जंगल सक्षम
उल्हास कारंथ : प्राण्यांना उपचारासाठी जंगलातून हलविण्याला विरोध
नागपूर : जगाच्या तुलनेत भारतात वाघांची स्थिती खूप चांगली आहे. नुकत्याच झालेल्या व्याघ्र गणनेनुसार आपल्या देशात सुमारे दोन हजार वाघ आहेत. देशातील जंगलाचे क्षेत्रफळ बघितले तर सुमारे १० हजार वाघ येथे आरामात वास्तव्य करू शकतात. त्यासाठी हे जंगल सक्षम आहे, असे मत विश्व प्रमुख व्याघ्र संवर्धन वैज्ञानिक डॉ. उल्हास कारंथ यांनी व्यक्त केले. नागपूर दौऱ्यावर आले असता डॉ. कारंथ यांनी बुधवारी वन सभागृहात पत्रकार, वन अधिकारी आणि वन्यजीव संरक्षणाशी जुळलेल्या संस्थांशी चर्चा केली व त्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली.
याप्रसंगी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीभगवान, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनीता सिंह, विनयकुमार सिन्हा, प्रवीण श्रीवास्तव, शेषराव पाटील, डॉ. एन. रामबाबू, डीएफओ गिरीश वशिष्ठ उपस्थित होते. डॉ. उल्हास कारंथ यांनी मागच्या ३० वर्षांत विशेषत: कर्नाटकच्या जंगलासोबतच देश व विदेशातील विविध व्याघ्र प्रकल्पात अनेक वर्षे टायगर इकोलॉजीवर संशोधन केले आहे. डॉ. कारंथ पुढे म्हणाले, वाघ आणि इतर वन्यजीवांची खाद्यस्थिती सुधारली पाहिजे.
वाघाचे खाद्य वाढविण्यासाठी तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढली पाहिजे. याशिवाय देशभरातील व्याघ्र प्रकल्पात सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेतली तर वाघांची संख्या आणखी वाढू शकते. माझ्या मते, वाघ, बिबट आणि इतर वन्यप्राण्यांना आजाराच्या स्थितीतही जंगलातच राहू दिले पाहिजे. त्यांना येथेच आरोग्यलाभ मिळू शकतो. त्यांना उपचारासाठी ट्रँक्यृूलाईज करून रेस्क्यू सेंटर वा प्राणिसंग्रहालयात हलविणे योग्य नाही. यावर गंभीरतेने विचार झाला पाहिजे. कारण, इथून या प्राण्यांना परत जंगलात सोडताना यश मिळण्याची शक्यता कमी असते व मग नाईलाजाने त्या प्राण्यांना आयुष्यभर पिंजऱ्यात कैद व्हावे लागते.(प्रतिनिधी)
एक वाघ बघायला डझनभर जिप्सी नकोत
व्याघ्र प्रकल्पात वेगाने वाढणाऱ्या पर्यटनाबाबत बोलताना डॉ. कारंथ म्हणाले, एक वाघ बघायला त्याच्यामागे डझनभर जिप्सी घेऊन फिरणे योग्य नाही. वाघाचे क्षेत्र खूप मोठे असते आणि अनेकदा तो आपले क्षेत्र बदलूनही इकडे तिकडे जात असतो. वाघ नेमका कुठे कुठे जातो यावर लक्ष ठेवण्यासाठी रेडियो कॉलर हा चांगला पर्याय आहे. परंतु त्यातही तांत्रिक अडचण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनक्षेत्रात निरंतर भ्रमण आवश्यक आहे. टायगर कॉरीडोरला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सरकारी संस्थांसोबत समन्वय स्थापित करून योजना तयार करायला हवी.