परराष्ट्र धोरणाच्या प्रभावासाठी देश एकात्म असावा
By Admin | Updated: October 5, 2015 03:07 IST2015-10-05T03:07:27+5:302015-10-05T03:07:27+5:30
देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीसाठी शेजारच्या देशांशी आणि संपूर्ण जगाशी आपले मैत्रीपूर्ण संबंध महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच परराष्ट्र धोरण प्रभावी असले पाहिजे.

परराष्ट्र धोरणाच्या प्रभावासाठी देश एकात्म असावा
चर्चेतील मान्यवरांचा सूर : भारताचे परराष्ट्र धोरण व आजची स्थिती
नागपूर : देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीसाठी शेजारच्या देशांशी आणि संपूर्ण जगाशी आपले मैत्रीपूर्ण संबंध महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच परराष्ट्र धोरण प्रभावी असले पाहिजे. पण परराष्ट्र धोरण म्हणजे केवळ नेतृत्वाने घेतलेले निर्णय नव्हे. त्यात लोकसहभाग असला पाहिजे. भारत विविधतेने नटलेला देश आहे. येथे अनेक जाती, धर्म, संप्रदाय आणि विविध विचारांचे लोक आहेत. त्यामुळे प्रत्येक विचारांचा, धर्माचा आदर ठेवून त्यांचीही मते विचारात घेऊन परराष्ट्र धोरण आखलेले असावे. कुठल्याच विचारधारेच्या लोकांवर नेतृत्वाने विशिष्ट विचार लादणे, योग्य ठरणार नाही. मोदी सरकार परराष्ट्र धोरण प्रभावीपणे राबवित आहे पण यात उणिवाही जास्त आहेत. प्रभावी परराष्ट्र धोरणासाठी अंतर्गत कलह संपवून संपूर्ण देश एकात्म करण्याचा प्रयत्न करावा लागेल, असा सूर चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केला.
गिरीश गांधी प्रतिष्ठानच्यावतीने ‘भारताचे परराष्ट्र धोरण व आजची स्थिती’ विषयावर बाबुराव धनवटे सभागृह, शंकरनगर येथे चर्चासत्राचे आयोजन रविवारी करण्यात आले. अध्यक्षस्थानी लोकमतचे संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार तर वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर, सरहद संस्थेचे संजय नहार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मोहन काशीकर यांनी मत व्यक्त केले. व्यासपीठावर प्रतिष्ठानचे पदाधिकारी डॉ. अक्षयकुमार काळे, डॉ. प्रमोद मुनघाटे, अजय पाटील उपस्थित होते. पाडगावकर म्हणाले, जागतिक आणि देशांतर्गत घडामोडींवर नेतृत्वाचे लक्ष असणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यानंतर कोल्ड वॉरची स्थिती, आर्थिक स्थिती कमकुवत होती. त्यामुळे पाकिस्तान, चीन या देशांशी फारसे सलोख्याचे संबंध प्रस्थापित होऊ शकले नाही. नरसिंहराव यांच्या काळात आर्थिक प्रगतीचे प्रयत्न झाले. वाजपेयींनीही त्याला प्रोत्साहन दिले. त्यानंतर न्युक्लिअर टेस्ट झाल्या आणि भारतावर दबाव वाढला. एखाद्या सरकारने घेतलेला निर्णय त्यानंतरच्या प्रत्येक सरकारने समोर नेला. हे सातत्य भारतात राहिले पण प्रत्येक सरकारने आपापल्या पद्धतीने हे निर्णय राबविले. सध्या मोदी वेगळ्या पद्धतीने परराष्ट्र धोरण राबवित आहेत आणि जागतिक संबंधात ते महत्त्वाचे काम करीत आहेत. मोदींनी परराष्ट्र संबंधात एक ऊर्जा निर्माण केली पण त्यांच्या काही निर्णयाने भारतीय समाजाला फूट पडण्यासापासून वाचविण्याची गरज आहे.
सुरेश द्वादशीवार म्हणाले, नेहरूंनी परराष्ट्र धोरणाला प्रारंभ केला. पण त्यावेळची स्थिती बिकट होती. पाकिस्तान अमेरिकेच्या लष्करी गटात सहभागी झाला आणि रशियात स्टॅलिन नेहरू आणि पटेलांना भांडवलवादी मानत होता. त्यामुळे अमेरिकेशी आणि रशियाशी संबंध ठेवणे कठीण होते. त्यामुळेच नेहरूंनी अलिप्त राहणे स्वीकारले पण सहभागी होण्याचे स्वातंत्र्य त्यांनी अबाधित ठेवले. त्याचा चांगला परिणाम नंतर दिसला. शस्त्र बळावरच परराष्ट्र धोरण ठरते. त्यामुळे अनेक मर्यादा पडतात.
सध्याची जागतिक स्थिती आणि भारतीय वातावरण आहे. मोदी इतर देशांसोबत संबंध प्रस्थापित करीत असले तरी जागतिक स्तरावर ते बोलतात त्याच्या विपरित स्थिती भारतात असेल तर त्यांच्या वक्तव्याला अर्थ उरत नाही. धार्मिक, राजकीय, सामाजिक सलोखा सांभाळण्याचे आव्हान मोदींना पेलावे लागेल. त्याशिवाय परराष्ट्र धोरण यशस्वी होणार नाही, असे ते म्हणाले.
संजय नहार म्हणाले, परराष्ट्र धोरणात संपूर्ण जगाचा विचार करणे अपेक्षित आहे. पण भारतीय परराष्ट्र धोरण नेहमीच पाकिस्तानशी संबंधित राहिले. मोदी इतर देशांशी सलोखा वाढवित आहेत पण त्यात टीमवर्क जाणवत नाही. पाकिस्तान, काश्मीरचा मुद्दा, जातीयता, दहशतवाद, धर्मांधता या साऱ्याच बाबी परराष्ट्र धोरणावर प्रभाव टाकणाऱ्या आहेत.
ी आव्हाने सरकारने गांभीर्याने घ्यायला हवीत. मोहन काशीकर म्हणाले, मोदींनी परराष्ट्र धोरणावर स्वत:ची मुद्रा उमटविली आहे. इथर देशांशी संबंधात बळकटी आणून व्यापारी, आर्थिक, राजकीय प्रगती भारत करीत आहे.
पाकिस्तानला जगात एकटे पाडण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. यात ते लोकसहभागही वाढवित आहेत ही चांगली बाब आहे. संचालन कोमल ठाकरे यांनी तर आभार अजय पाटील यांनी मानले. (प्रतिनिधी)