कापूसकोंडी सुटेना; दरवाढीसाठी निर्यातीत सातत्य आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2023 08:00 IST2023-01-13T08:00:00+5:302023-01-13T08:00:07+5:30

Nagpur News चालू हंगामात शेतकऱ्यांना कापसाला किमान १० हजार रुपये प्रतिक्विंटल दर हवा आहे. हा दर कापड उद्याेगांना महाग वाटत असल्याने त्यांना कमी दरात कापूस हवा आहे.

Cotton crisis not solved; Continuity in exports is necessary for price hike | कापूसकोंडी सुटेना; दरवाढीसाठी निर्यातीत सातत्य आवश्यक

कापूसकोंडी सुटेना; दरवाढीसाठी निर्यातीत सातत्य आवश्यक

ठळक मुद्देकापड उद्याेगाला हवा कमी दरात कापूसशेतकऱ्यांना हवी दरवाढ

सुनील चरपे

नागपूर : चालू हंगामात शेतकऱ्यांना कापसाला किमान १० हजार रुपये प्रतिक्विंटल दर हवा आहे. हा दर कापड उद्याेगांना महाग वाटत असल्याने त्यांना कमी दरात कापूस हवा आहे. १० हजार रुपयांची पातळी गाठण्यासाठी कापसाचे दर किमान एक लाख रुपये खंडी (३५६ किलाे रुई) व्हायला हवे. कापसाची निर्यात करून निर्यातीतील सातत्य कायम ठेवावे तसेच निर्यातीला केंद्र सरकारने इन्सेंटिव्ह द्यावा, अशी माहिती शेतमाल बाजार तज्जांनी दिली.

मागील हंगामात जागतिक बाजारात रुईचे दर १ डाॅलर ७० सेंट प्रतिपाउंडवर पाेहाेचल्याने भारतात कापसाच्या दराने प्रतिक्विंटल १० हजार रुपयांची, तर रुईच्या दराने प्रतिखंडी एक लाख रुपयांची पातळी ओलांडली हाेती. यावर्षी जागतिक बाजारातील रुईचा दर सुरुवातीपासून आजवर १ डाॅलर प्रतिपाउंडच्या आसपास घुटमळत आहे. त्यामुळे भारतात कापसाला सरासरी ८ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. या दरात वाढ हाेण्याची शक्यता सध्या तरी नाही, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

सध्या रुईचे दर प्रतिखंडी ६१ ते ६३ हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. देशात सरकीचे दर ३,६०० ते ४,००० रुपये प्रतिक्विंटल असल्याने कापसाला ८,२०० ते ८,५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. गेल्या पंधरवड्यात सरकीचा दर प्रतिक्विंटल ३,४०० रुपयांपर्यंत खाली आल्याने कापसाचे दर कमी झाले हाेते. शेतकऱ्यांना १० हजार रुपये प्रतिक्विंटलची अपेक्षा आहे. ही पातळी गाठण्यासाठी किमान ४५ लाख गाठी कापसाची व सुताची निर्यात करणे, यात सातत्य ठेवणे व निर्यातीला केंद्र सरकारने साखरेप्रमाणे इन्सेंटिव्ह देणे आवश्यक आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ललित बहाळे यांनी दिली.

कापसाची निर्यात (लाख गाठी)

सन - निर्यात - आयात

२०१८-१९ - ४३.५५ - ३५.३७

२०१९-२० - ४७.०४ - १५.५०

२०२०-२१ - ७७.५९ - ११.०३

२०२१-२२ - ४६.०० - १८.००

२०२२-२३ - ४६ - १३.०० (अपेक्षित)

कापसाचा वापर घटवला

कमिटी ऑन कॉटन प्रोडक्शन अँड कन्झम्शनच्या अहवालानुसार सन २०२१-२२ मध्ये देशात ७१.८४ लाख, तर सन २०२१-२२ मध्ये ४६.५१ लाख गाठी कापसाचा शिल्लक साठा हाेता. मुळात सन २०२१-२२मध्ये कापसाचे एकूण उत्पादन ३०७.६० लाख गाठींचे असून, यातील ४६ लाख गाठींची निर्यात, तर १८ लाख गाठींची आयात केली. या काळातील ३१४ लाख गाठी कापसाचा वापर हाेणे अपेक्षित असताना कापड उद्याेगांनी पाॅलिस्टर धाग्याचा वापर केल्याने कापसाचा वापर २७५ लाख गाठींवर आला.

शिल्लक साठ्याचा वापर दर पाडण्यासाठी

कापसाच्या गाठींची निर्यात करून कापसाच्या साठ्यात याेग्य ताळमेळ साधणे आवश्यक आहे. यावर्षी कापसाची निर्यात न झाल्यास किमान ४५ लाख गाठींचा शिल्लक साठा दाखविण्यात येईल. याच साठ्याचा वापर सन २०२३-२४च्या हंगामात कापसाचे दर पाडण्यासाठी केला जाईल, अशी माहिती शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी दिली.

चुकीच्या माहितीद्वारे दिशाभूल

कापसाला प्रतिक्विंटल १५ हजार रुपये दर मिळणार असल्याच्या तसेच १० हजार रुपये दर मिळाल्याच्या पाेस्ट साेशल मीडियावर व्हायरल हाेत आहेत. जागतिक बाजारातील दर विचारात घेता, या पाेस्ट दिशाभूल करणाऱ्या असल्याने शेतकऱ्यांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन बाजार तज्ज्ञांनी केले आहे.

Web Title: Cotton crisis not solved; Continuity in exports is necessary for price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस