कॉ़ पानसरेंचा झंझावात आजही वैदर्भीयांच्या स्मरणात
By Admin | Updated: February 22, 2015 02:29 IST2015-02-22T02:29:22+5:302015-02-22T02:29:22+5:30
अख्खे आयुष्य समाज परिवर्तनाचा वसा घेऊन जगलेल्या कॉम्रेड गोविंद पानसरे नावाच्या वादळाचा झंझावात अवघ्या महाराष्ट्राप्रमाणे नागपूर-विदर्भानेही अनुभवला़ पुरोगामी

कॉ़ पानसरेंचा झंझावात आजही वैदर्भीयांच्या स्मरणात
कॉ़ बाळ अलोणी
अख्खे आयुष्य समाज परिवर्तनाचा वसा घेऊन जगलेल्या कॉम्रेड गोविंद पानसरे नावाच्या वादळाचा झंझावात अवघ्या महाराष्ट्राप्रमाणे नागपूर-विदर्भानेही अनुभवला़ पुरोगामी चळवळीशी निगडीत असलेल्या सर्व संस्था, कार्यकर्ते यांच्याशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता़ आज त्यांच्या मृत्यूनंतर या सर्व आठवणी एकामागून एक माझ्या डोळयासमोरून तरळत आहेत़ माझी व पानसरेंची ओळख १९७४ साली पक्षाच्या पहिल्या राज्य परिषदेत सोलापुरात झाली़ त्यावेळी शिवाजी महाराजांबद्दल होणाऱ्या चर्चेत शिवाजी आमचा की तुमचा, असा वाद होत होता़ तेव्हा कॉ़ पानसरे यांनी ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक लिहिले़ त्याच्या सुमारे एक लक्ष प्रती विकल्या गेल्या़
या प्रक्रियेत मीसुद्धा सहभागी होतो़ आम्ही याच विषयावर धनवटे रंगमंदिरात एक व्याख्यानमाला आयोजित केली़ कॉ़ भाई बर्धन अध्यक्ष होते़ या व्याख्यानमालेला आम्ही केवळ दोन रुपये तिकीट ठेवले होते़ मला आजही लख्ख आठवतेय धनवटे रंगमंदिरात पाय ठेवायलाही जागा नव्हती़ नागपुरातील जवळ-जवळ सर्वच वृत्तपत्रांनी या कार्यक्रमाला भरघोस प्रसिद्धी दिली होती़ १९९९ साली अमरावती येथे झालेल्या पक्षाच्या राज्य परिषदेत कॉ़ पानसरेंचा महत्त्वाचा वाटा होता़