‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ ला मोदींच्या घरातूनच सुरुंग
By Admin | Updated: April 30, 2015 02:22 IST2015-04-30T02:22:08+5:302015-04-30T02:22:08+5:30
देशातील भ्रष्टाचार दूर व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मोठमोठी आव्हाने करण्यात येत आहेत.

‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ ला मोदींच्या घरातूनच सुरुंग
नागपूर : देशातील भ्रष्टाचार दूर व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मोठमोठी आव्हाने करण्यात येत आहेत. परंतु ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ या संकल्पनेला मोदी यांच्या घरूनच आव्हान मिळाले आहे. नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी खुलेपणाने भ्रष्टाचाराचे समर्थन केले आहे. नागपुरात आयोजित एका पत्रपरिषदेदरम्यान रेशन दुकानदारांच्या मुद्यावर बोलताना प्रल्हाद मोदी यांनी सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली.
‘आॅल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर्स’चे उपाध्यक्ष असलेले प्रल्हाद मोदी हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याविषयी माहिती देत असताना मोदी यांनी विविध विषयांवर आपले मत मांडले. देशातील सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजेच रेशनच्या व्यवस्थेत फारसा फरक पडलेला नाही. आता ही प्रणाली ‘हायटेक’ रूप घेत आहे. परंतु दुसरीकडे दुकानदारांच्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी कुठलेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. रेशन दुकानदारांप्रती केंद्र शासनाचे धोरण उदासीन आहे. मागणी अगोदरच कमी झाली असताना दुकानदारांना अत्यल्प कमिशनवर काम करावे लागत आहे. अशा स्थितीत कुटुंबीयांना पोसण्यासाठी दुकानदारांना गैरप्रकार करावे लागतात. अशा प्रकारच्या भ्रष्टाचारात काहीच वावगे नाही असे मोदी यांनी प्रतिपादन केले.
यासंदर्भात मार्च महिन्यात नवी दिल्ली येथे मोठे आंदोलन उभारले होते. केंद्र शासनाने रेशन दुकानदारांना महिन्याला २५ हजार रुपये तरी कमिशन मिळेल असे धोरण तयार करावे किंवा त्यांना शासकीय कर्मचारी तरी घोषित करावे अशी मागणी मोदी यांनी केली. संपूर्ण देशासाठी एकच धोरण तयार करण्याची गरज आहे. मागील शासनांप्रमाणेच मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनेदेखील या मुद्यावर मौन साधले आहे. पंतप्रधान मोदी यांनी यात लक्ष घालावे असेदेखील ते म्हणाले. (प्रतिनिधी)