नगरसेविका यादव यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:11 IST2021-03-04T04:11:01+5:302021-03-04T04:11:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - मुन्ना यादव, पंजू तोतवाणी तसेच त्यांच्या साथीदारांवर घर खाली करून घेण्यासाठी अश्लील शिवीगाळ करून ...

Corporator Yadav's complaint to the Commissioner of Police | नगरसेविका यादव यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

नगरसेविका यादव यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - मुन्ना यादव, पंजू तोतवाणी तसेच त्यांच्या साथीदारांवर घर खाली करून घेण्यासाठी अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केल्याचा आरोप लावणारी महिला वादग्रस्त आहे. तिने यापूर्वीही एक आमदार, एका पक्षाचे शहराध्यक्ष तसेच अन्य प्रतिष्ठितांवर घाणेरडे आरोप लावल्याचे तक्रारवजा निवेदन मुन्ना यादव यांच्या पत्नी तसेच नगरसेविका तारा ऊर्फ लक्ष्मी यादव यांनी पोलीस आयुक्तांकडे दिले आहे. त्यांनी या संबंधाने सादर केलेले कागदपत्र बघता पोलीस आयुक्तांनी या तक्रारीची चाैकशी करण्याचे आदेश दिल्याने प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.

मालमत्तेच्या वादग्रस्त व्यवहारातून भाजपाचे स्थानिक नेते आणि बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे माजी अध्यक्ष मुन्ना यादव तसेच राजबीर यादव, गणेश यादव, प्रमोद डोंगरे यांनी अश्लील शिवीगाळ करून तिला धमकी दिल्याची तक्रार ४० वर्षीय महिलेने केल्याने एमआयडीसी पोलिसांनी २ फेब्रुवारीला उपरोक्त आरोपींविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता तर २८ फेब्रुवारीला अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार कलम वाढविले आहे. यावेळी आरोपींमध्ये पंजू तोतवानी यांचेही आरोपी म्हणून या प्रकरणात नाव जोडण्यात आले होते. प्रकरणाला राजकीय गटाची किनार असल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. एकीकडून चुकीचा गुन्हा दाखल झाल्याचा तर दुसरीकडून पोलीस आरोपींना अटक करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याच आरोप होत होता. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी सायंकाळी मुन्ना यादव यांच्या पत्नी, नगरसेविका लक्ष्मी यादव यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. आपल्या पतीला राजकीय वादातून बदनाम केले जात असल्याचा आरोप करून तक्रारदार महिला वादग्रस्त असल्याचे त्यांनी आयुक्तांना सांगितले. या महिलेने एक स्वच्छ प्रतिमेचे आमदार, एका मोठ्या पक्षाचे माजी शहराध्यक्ष तसेच वकिलासह अनेकांवर अशा प्रकारे यापूर्वी आरोप लावून त्यांना ब्लॅकमेल केल्याचे तक्रारवजा निवेदन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले. त्यासंबंधीची काही कागदपत्रेही आयुक्तांना दिली. ती बघता आयुक्तांनी ही बाजू तपासून पाहण्यासाठी चाैकशी करण्याचे आश्वासन नगरसेविका यादव यांना दिले.

---

कुणावरही अन्याय होणार नाही - आयुक्त

शहरात कायद्याचेच राज्य चालेल. आरोपी किती मोठा आहे, तो कुणाशी जुळला आहे, त्याच्याशी काही संबंध नाही. दोषी असेल तर त्याची गय केली जाणार नाही आणि कोणत्याही निर्दोष व्यक्तीवर पोलिसांकडून अन्याय होणार नाही, असे मत यासंबंधाने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी लोकमतशी बोलताना मांडले.

----

Web Title: Corporator Yadav's complaint to the Commissioner of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.