नगरसेवकाने आपटली फाईल, नाराज आयुक्त गेले निघून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:09 IST2020-12-31T04:09:07+5:302020-12-31T04:09:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रभागातील विकास कामे वर्षभरापासून ठप्प असल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचा ...

Corporator hits file, angry commissioner leaves! | नगरसेवकाने आपटली फाईल, नाराज आयुक्त गेले निघून!

नगरसेवकाने आपटली फाईल, नाराज आयुक्त गेले निघून!

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्रभागातील विकास कामे वर्षभरापासून ठप्प असल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी सदस्यांनी उपस्थित केला. कामे कधी सुरू होणार, असा सवाल केला. यावर प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपचे नगरसेवक संजय चवरे यांनी फाईल टेबलवर आपटून रोष व्यक्त केला. यामुळे नाराज झालेले मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. बैठकीतून निघून गेले.

विशेष म्हणजे मंगळवारी आयुक्त उपस्थित नसल्याने समितीची बैठक स्थगित करून आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी आयुक्तांच्या उपस्थितीत स्थायी समितीचे अध्यक्ष विजय झलके यांनी बैठकीला सुरुवात करताच सदस्यांनी विकास कामांचा मुद्दा उपस्थित केला. यावर आयुक्तांनी मनपावर ७०० कोटींचे दायित्व असल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे ३०० कोटी, सार्वजनिक आरोग्य व अभियांत्रिकी विभागाकडे २३० कोटी, सातव्या वेतन आयोगाचे १०० कोटी व अन्य ७० कोटींच्या देणीचा यात समावेश आहे. जुणी देणी असल्याने नवीन कामांना निधी उपलब्ध होणार नाही, अशी भूमिका आयुक्तांनी मांडली.

बैठकीत ठप्प असलेल्या विकास कामांवर कोणताही निर्णय न होता आयुक्त निघून गेल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. निधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत प्रशासकीय प्रस्तावांना मंजुरी न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष विजय झलके यांनी दिली.

.

Web Title: Corporator hits file, angry commissioner leaves!