नगरसेविका गार्गी चोपरा यांचा राजीनामा
By Admin | Updated: March 4, 2017 01:49 IST2017-03-04T01:49:32+5:302017-03-04T01:49:32+5:30
काँग्रेसच्या प्रभाग १० मधील नगरसेविका गार्गी चोपरा यांनी शुक्रवारी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला.

नगरसेविका गार्गी चोपरा यांचा राजीनामा
पोस्टाने पाठविला राजीनामा : काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी
नागपूर : काँग्रेसच्या प्रभाग १० मधील नगरसेविका गार्गी चोपरा यांनी शुक्रवारी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा स्पीड पोस्टने महापालिका आयुक्त, मावळते महापौर प्रवीण दटके व काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांना पाठविला. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीतून त्यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे. चोपरा यांनी मात्र आपण व्यक्तिगत कारणाने राजीनामा देत असल्याचे लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.
प्रभाग १० मध्ये काँग्रेसने चारही जागा जिंकल्या होत्या. चोपडा (१०९८१ मते )यांच्यासह साक्षी राऊत (९४५६ मते), रश्मी धुर्वे (९५७७मते) व नितीश ग्वालबन्सी (९०८४ मते) विजयी झाले होते. चोपडा यांनी ४४८६ मतांनी विजय मिळविला होता तर ग्वालबन्सी हे फक्त ६८ मतांनी विजयी झाले होते. ग्वालबन्सी यांना राष्ट्रवादीकडून लढलेले रमेश घाटोळे यांचा फटका बसला होता. एकाच पॅनलमध्ये असलेल्या या दोन उमेदवारांच्या मताधिक्यातील फरक चर्चेचा विषय ठरला होता.
राजीनाम्याबाबत विचारणा केली असता गार्गी चोपडा यांचे पती डॉ. प्रशांत यांनी व्यक्तिगत कारणावरून राजीनामा देत असल्याचे सांगितले. राजकारणात मन भरले आहे, असे सांगत त्यांनी यावर अधिक बोलण्यास नकार दिला.
निगम सचिव हरीश दुबे यांनीही चोपडा यांचा राजीनामा प्राप्त झाला नसल्याचे सांगितले. पोस्टाने आलेला राजीनामा स्वीकारला जातो का, अशी विचारणा केली असता कोणत्याही माध्यमाने प्रशासनापर्यंत राजीनामा पोहचला तर त्यावर
विचार होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, जाणकारांच्या मते पोस्टाने दिलेला राजीनामा तांत्रिकदृष्ट्या नगरसेवकांची पुन्हा संमती घेतल्याशिवाय मंजूर केला जात नाही.
राजीनामा मिळाला नाही : मनपा प्रशासन
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांना विचारणा केली असता त्यांनी महापालिका प्रशासनाकडे कोणत्याही नगरसेवकाचा राजीनामा आला नसल्याचे स्पष्ट केले. साधारणत: राजीनामा देणारी व्यक्ती स्वत: प्रशासनाकडे राजीनामा आणून देत असते, असेही त्यांनी सांगितले.
नाराजी दूर करू
नगरसेविका गार्गी चोपडा यांच्या राजीनाम्याची चर्चा कळताच आपण माहिती घेतली. त्यांनी महापालिका आयुक्तांकडे किंवा पक्षाचे शहर अध्यक्ष म्हणून माझ्याकडेही राजीनामा दिलेला नाही. चोपडा या चार हजाराहून अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांचे पती माजी नगरसेवक डॉ. प्रशांत चोपडा हे काँग्रेसचे आधारस्तंभ आहेत. जनतेने त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाचा अनादर होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. त्यांची काही नाराजी असेल तर ती जाणून घेऊ.
- विकास ठाकरे, शहर अध्यक्ष, काँग्रेस