अजनी वनाशी संबंधित कागदपत्रे पुरवण्याची मनपाची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:10 IST2021-06-16T04:10:51+5:302021-06-16T04:10:51+5:30
नागपूर : संत्रा नगरीतील घनदाट अजनी वन वाचण्यासाठी जनहित याचिका दाखल करणाऱ्या अॅड. श्वेता बुरबुरे व छायाचित्रकार अजय तिवारी ...

अजनी वनाशी संबंधित कागदपत्रे पुरवण्याची मनपाची ग्वाही
नागपूर : संत्रा नगरीतील घनदाट अजनी वन वाचण्यासाठी जनहित याचिका दाखल करणाऱ्या अॅड. श्वेता बुरबुरे व छायाचित्रकार अजय तिवारी यांना येत्या ५ जुलैपर्यंत आवश्यक कागदपत्रे पुरवण्याची ग्वाही महानगरपालिकेने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.
या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने अजनी वनाशी संबंधित पुरेशी माहिती रेकॉर्डवर उपलब्ध नसल्याचा मुद्दा उपस्थित केला असता, याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. एम. अनिलकुमार यांनी महानगरपालिकेला वृक्ष समितीचा अहवाल, वृक्ष गणनेची माहिती व वृक्ष कापण्यासाठी सादर अर्जाची प्रत मागितली असल्याचे सांगितले, तसेच ही माहिती अद्याप मिळाली नाही, याकडे लक्ष वेधले. त्याच्या उत्तरात महानगरपालिकेने सदर ग्वाही दिली. त्यानंतर न्यायालयाने याचिकाकर्त्यांना पुढील तारखेपर्यंत याचिकेत आवश्यक दुरुस्ती करण्याची सूचना केली.
इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्पाकरिता अजनी वनातील ४९३० झाडे कापण्यात येणार आहेत. त्यासाठी महानगरपालिकेने २९ मे रोजी नोटीस जारी करून आक्षेप मागवले आहेत. ही नोटीस अवैध ठरवून रद्द करण्यात यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला केली आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे सरकारी जबाबदारी आहे. विविध पर्यावरण संस्थांच्या अहवालानुसार नागपूरचे तापमान व प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीत अजनीतील घनदाट वनसंपदा नष्ट केल्यास पर्यावरणाची मोठी हानी होईल, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.