मनपाचे पाच पोस्ट कोविड केअर सेंटर सोमवारपासून सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:07 IST2021-05-30T04:07:14+5:302021-05-30T04:07:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेतर्फे शहरामधील पाच पोस्ट कोविड केअर सेंटर सोमवारी ३१ मे पासून सुरू ...

मनपाचे पाच पोस्ट कोविड केअर सेंटर सोमवारपासून सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतर्फे शहरामधील पाच पोस्ट कोविड केअर सेंटर सोमवारी ३१ मे पासून सुरू होणार आहे. यात के.टी.नगर रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली सूतिकागृह, सदर रोगनिदान केंद्र आणि पक्वासा आयुर्वेदिक रुग्णालय आदीचा समावेश आहे. या सेंटरवर म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) ची चाचणी केली जाईल. यासंदर्भात शनिवारी टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. प्रशांत निखाडे यांनी मनपातील कोरोना वॉर रुममध्ये डॉक्टर, नर्सेस व वैद्यकीय अधिकारी यांना प्रशिक्षण दिले. त्यांनी रुग्णांची स्क्रिनिंग कशी केली जावी, याबाबत माहिती दिली. यावेळी टास्क फोर्सचे सदस्य डॉ. रामकृष्ण शिनाय, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. वर्षा देवस्थळे व डॉ. शुभम मनगटे उपस्थित होते.
या पोस्ट कोविड केअर सेंटरमध्ये म्युकरमायकोसिस चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे. पोस्ट कोविड केअर सेंटरवर सेवा देण्यासाठी मनपातर्फे १० डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोस्ट कोविड केअर सेंटरमध्ये सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार या चार दिवशी रुग्णांची स्क्रिनिंग केली जाईल. बुधवार आणि शनिवारी तज्ज्ञ डॉक्टर संशयित रुग्णांना मार्गदर्शन करतील, अशी माहिती संजय चिलकर यांनी दिली. मनपाच्या या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.