मनपा करणार डॉक्टरांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:09 IST2021-03-31T04:09:14+5:302021-03-31T04:09:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेतर्फे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत ...

मनपा करणार डॉक्टरांची नियुक्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेतर्फे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत विशेषज्ञ डॉक्टर तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात येणार आहे. सध्या शासकीय रुग्णालय तसेच मनपाच्या रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे. महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये ४०० अतिरिक्त खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
सध्याच्या प्रचलित मानधनानुसार एम.डी. डॉक्टरांना दोन लाख रुपयापर्यंत मानधन मिळत आहे. परंतु मनपातर्फे ५० हजार रुपये जास्त म्हणजे अडीच लाख रुपये मानधन तसेच एम.बी.बी.एस. डॉक्टरांना सध्या ६० हजार रुपये मानधन मिळत आहे. परंतु या पदासाठी मनपातर्फे एक लाख रुपयापर्यंत मानधन दिले जाणार आहे. डॉक्टरांनी कोरोनाबाधितांच्या उपचारात मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.