ठळक मुद्देअभिनेत्यांच्या डायलॉगमधून प्रबोधन : नागपूर पोलिसांकडून अशीही जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वच पातळ्यांवरून जनजागृती सुरू आहे. यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. नागपूर पोलिसांनीही नागरिकांच्या जनजागृतीसाठी अशीच कल्पना अमलात आणली आहे. अभिनेत्यांच्या फोटोंसह गाजलेल्या डायलॉगचा वापर करून सोशल मीडियावरून जनतेपर्यंत संदेश पोहचविला जात आहे.


सर्वच यंत्रणांच्या माध्यमातून जनजागृती सुरू असताना यात पोलीस विभागही मागे नाही. जनमानसावर आणि तरुणाईवर ठसा उमटविलेल्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांचा उपयोग त्यांनी कल्पकतेने करू न घेतला आहे. कोरोनापासून बचाव करण्याचा संदेश देण्यासाठी शाहरुख खान, अमजद खान, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोन यांसारखे अभिनेते नागरिकांच्या मोबाईल स्क्रीनवर पोलिसांच्या सोशल मीडियावरून झळकत आहेत. पंतप्रधानांनी देशात लागू केलेले लॉकडाऊन २१ दिवसांचे आहे.

कोरोनावर विजय मिळवायचा असेल तर ही २१ दिवसांची लढाई घरातच बसून जिंका, असा संदेश बिंबविण्यासाठी शाहरुख खानची ऐटबाज पोज असलेल्या छायाचित्राचा उपयोग करण्यात आला आहे. या चित्रासोबत ‘सीर्फ २१ दिन और..., व्हिक्टोरी इन...’ असा संदेश देण्यात आला आहे.


‘शोले’ चित्रपट गब्बरसिंंगच्या दणदणीत डायलॉगने गाजला आहे. अरे ओ सांबा.... हा यातीलच फेमस डायलॉग. याच प्रसंगातील ‘जो डर गया, समझो मर गया’ हेसुद्धा यातील एके काळी अत्यंत गाजलेले वाक्य. हेच वाक्य पोलिसांनी जनजागृतीसाठी वेगळया पद्धतीने वापरत, ‘जो बाहर गया, समझो मर गया...’ असा थेट संदेश दिला आहे.
संचारबंदीमुळे सर्वांनच घराबाहेर पडण्यास बंदी आहे. चौकाचौकात पोलीस दंडुके घेऊन उभे आहेत. ही परिस्थिती अमिताभ बच्चनच्या डायलॉगसोबत साधली आहे. त्यांचे अनेक डायलॉग आजही तरुणाईच्या ओठी आहेत. ‘हमे ढुंढना मुश्कील ही नहीं, नामुमकिन है’ असे म्हणत एकमेकांची फिरकी घेणारे मित्र आजही दिसतात. याच डायलॉगला नवे रूप देत, ‘घर से निकलना मुश्कील ही नही, नामुमकीन है’ असा संदेश पोलिसांनी दिला आहे.
दीपिका पदुकोन आणि शाहरुख खान यांची ‘ओम शांती ओम’मधील जोडी तरुणाईला चांगलीच भावली आहे. या दोघांचे एकत्रित असलेले छायाचित्र अनेकांच्या आवडीचे आहे. याच छायाचित्राचा उपयोग करून ‘होम शांती होम’ असा संदेश पोलिसांनी दिला आहे. कोरोनाच्या दिवसात घरातच राहा, तिथेच शांती आहे. बाहेर फिरून पोलिसांचा उगीच प्रसाद खाऊ नका, असेही कदाचित पोलीस विभागाला यातून सुचवायचे असावे.

Web Title: CoronaVirus in Nagpur: Whoever went out, he died ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.