लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरातील सहा झोन बाधित रुग्ण आढळून न आल्याने कोरोनामुक्त होते. मात्र मंगळवारी नागपूर महापालिका हद्दीतील धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ३५ मधील पार्वतीनगर येथील एका २२ वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाचा दक्षिण-पश्चिम नागपुरात शिरकाव झाला आहे. त्यामुळे धंतोली झोनमधील पार्वतीनगर, रामेश्वरी रोड, त्रिशरण चौक, हनुमान मंदिर परिसर, पाणी टाकी, रेल्वे कॉलनी परिसर, रेल्वे संरक्षण भिंत, अजनीचा काही भाग सील करण्यात आला असून कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.पार्वतीनगर येथे कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात होऊ नये म्हणून नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता हा संपूर्ण परिसर सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी दिले. या भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करून या भागाच्या सीमा आवागमनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.घोषित करण्यात आलेले प्रतिबंधित क्षेत्रपश्चिमेस - रेल्वे कॉलनी सीमा रेषा समाप्त (श्रीवास्तव हाऊस)दक्षिणेस - मौर्य सभागृह, पार्वतीनगरदक्षिण-पूर्वेस - प्रबुद्ध बुद्धविहार, रामेश्वरी रोडउत्तर-पूर्वेस -त्रिशरण चौक, पंकज स्वीट मार्टउत्तरेस- विजय मिश्रा यांचे घर (मशिदीजवळ)उत्तरेस-हनुमान मंदिर, तिवारी यांचे घरउत्तर-पश्चिमेस -संजय किराणा (अमर टेलर)पश्चिमेस -रेल्वे संरक्षण भिंत (कंटेनर डेपो परिसर सुरू)
CoronaVirus in Nagpur : दक्षिण-पश्चिम नागपुरातील पार्वतीनगर परिसर सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 23:36 IST