Coronavirus in Nagpur; पॉझिटिव्ह आल्यास कर्करुग्णांनी शस्त्रक्रिया, रेडिएशन व केमोथेरपी पुढे ढकलावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 06:57 AM2021-05-10T06:57:24+5:302021-05-10T06:57:46+5:30

Nagpur News कमी प्रतिकारशक्ती असल्यामुळे कर्करोगाने ग्रस्त असलेल्यांना गंभीर कोरोना होऊ शकतो. संसर्गाच्या दरानुसार या लोकांना बाधा होण्याची जास्त शक्यता असते.

Coronavirus in Nagpur; If positive, cancer patients should postpone surgery, radiation and chemotherapy | Coronavirus in Nagpur; पॉझिटिव्ह आल्यास कर्करुग्णांनी शस्त्रक्रिया, रेडिएशन व केमोथेरपी पुढे ढकलावी

Coronavirus in Nagpur; पॉझिटिव्ह आल्यास कर्करुग्णांनी शस्त्रक्रिया, रेडिएशन व केमोथेरपी पुढे ढकलावी

Next
ठळक मुद्देकर्करुग्णांचे लसीकरण आवश्यक, घाबरण्याची गरज नाही

मेहा शर्मा  
लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लोक अक्षरशः दहशतीत आले असून, कर्करुग्णांच्या मनात तर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. कोरोना व कर्करोग यासंदर्भात ‘लोकमत’ने नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक यांच्याशी संवाद साधला.

कर्करुग्णांना कोरोना संसर्गाचा किती धोका असतो ?

कमी प्रतिकारशक्ती असल्यामुळे कर्करोगाने ग्रस्त असलेल्यांना गंभीर कोरोना होऊ शकतो. संसर्गाच्या दरानुसार या लोकांना बाधा होण्याची जास्त शक्यता असते.

या काळात कर्करुग्णांसाठी सर्वाधिक चिंतेची बाब कोणती ?

उपचारादरम्यान रुग्ण पॉझिटिव्ह येणे हे त्याच्यासाठी व त्याच्यावर उपचार करणाऱ्या ऑंकोलॉजिस्टसाठी मोठे आव्हान असते. कोरोनामुळे उपचारावर मर्यादा येतात. शिवाय नियोजित शस्त्रक्रिया व रेडिएशन थेरपी पुढे ढकलावी लागते. कोरोनासाठी आयसोलेशन आवश्यक आहे आणि कोरोनाशी संबंधित गंभीरता निर्माण झाली तर उपचारांची दिशा बदलावी लागते.

कर्करुग्णांची रोगप्रतिकारक्षमता वाढावी, यासाठी काही औषधे आहेत का ?

योग्य पद्धतीने फीट होणारे मास्क, सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंग हीच मुख्य खबरदारी आहे. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये रुग्णांवरील उपचाराचे क्षेत्र व प्रतीक्षा केंद्र हेदेखील वेगळे ठेवले आहे. त्यामुळे कर्करुग्ण रुग्णालयातील विषाणूशी संपर्कात येत नाहीत.

जर कर्करुग्ण पॉझिटिव्ह आले तर त्यांच्या आजारात आणखी भर पडेल की ते इतर रुग्णांसारखे कोरोनातून ठीक होतील?

हे आवश्यक नाही. अनेक कर्करुग्ण कोरोनाने बाधित झाले होते, मात्र त्यातून ते पूर्णतः बाहेर निघाले आहेत. मात्र त्यांना मधुमेह, रक्तदाब असेल किंवा कर्करोग फुप्फुसांपर्यंत पसरला असेल तर मात्र जटिलता वाढू शकते.

पॉझिटिव्ह आल्यानंतर कर्करुग्णांनी उपचार-थेरपी सुरू ठेवावी का ?

जर शस्त्रक्रिया असेल तर ते निगेटिव्ह येईपर्यंत ती पुढे ढकलायला हवी. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होण्याचा धोका असतो. शिवाय शस्त्रक्रियेनंतर रिकव्हरीला वेळ लागू शकतो. सोबतच श्वसनाशी संबंधित समस्या निर्माण होऊन मृत्यू होण्याचीदेखील भीती असते. नियोजित रेडिएशन व केमोथेरपीदेखील थांबवणे योग्य ठरते. परंतु जर आयुष्य वाचविण्यासाठी पावले उचलायची असतील तर इतर काळजी घेऊन शस्त्रक्रिया होऊ शकते. लवकरात लवकर रेडिएशनदेखील सुरू होऊ शकते कारण तो शरीराच्या एकाच भागावर प्रभाव करतो. मात्र केमोथेरपी ही मात्र शरीर सर्व बाबींसाठी सज्ज झाल्यावरच करावी.

कोरोना व थेरपीमुळे भूक कमी होते. मग ठीक होण्यासाठी आहार कसा असावा ?

ही अतिशय कठीण स्थिती आहे. लवकरात लवकर ठीक होण्यासाठी आहारतज्ज्ञांकडून विशेष आहार देण्यात येतो किंवा आम्ही त्यांना आयव्ही न्यूट्रिशन्सच्या सप्लिमेन्टवर ठेवतो.

रुग्णालयात भरती झाल्यानंतर रुग्णांनी कोणत्या तज्ज्ञांना संपर्क करावा ?

कर्करुग्ण कोरोनामुळे भरती झाल्यास त्याने कोविडतज्ज्ञ तसेच ऑंकोलॉजिस्ट अशा दोघांनाही संपर्क करायला हवा. ऑंकोलॉजिस्टला उपचारांची पूर्ण माहिती असली पाहिजे. कोरोनाच्या औषधांची कर्करोगाच्या औषधासोबतच सरमिसळ व्हायला नको.

ब्लडथिनर्स थांबवावे का ?

ब्लडथिनर्सचा वापर करायलाच हवा, अन्यथा त्यामुळे थ्रॉम्बॉसिस होऊ शकतो. मात्र काही रुग्णांमध्ये त्यांचा एकूण इतिहास पाहता ऑंकोलॉजिस्टचा सल्ला घेऊन त्यांना थांबवता येऊ शकते.

कर्करुग्णांचे लसीकरण व्हावे का ?

कर्करुग्णांचेदेखील लसीकरण झाले पाहिजे. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही अनेक कर्करुग्णांचे लसीकरण केले आहे. मात्र लिम्फोसाइट असलेल्या रुग्णांसाठी ते किती फायदेशीर ठरेल हे सांगता येत नाही.

कर्करुग्णांसाठी लसीकरणाची मार्गदर्शक तत्त्वे सारखीच आहेत का ?

ते वेगळ्या गटातील लोक आहेत. त्यामुळे त्यांचा आजार व थेरपी यांचा विचार व्हायला हवा. कर्करुग्णांचे लसीकरण करण्याचा सल्ला देण्यात येतो, कारण त्यामुळे त्यांना विषाणूच्या घातक प्रभावापासून वाचता येऊ शकते.

कर्करुग्णांनी कोरोनाची नियमित चाचणी करावी का ?

अजिबात नाही. जर त्यांची शस्त्रक्रिया होणार असेल तरच त्यांनी चाचणी करावी, अन्यथा लक्षणांप्रमाणे त्यांनी चाचणी करावी. नियमित चाचणीची काहीच आवश्यकता नाही.

Web Title: Coronavirus in Nagpur; If positive, cancer patients should postpone surgery, radiation and chemotherapy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.