CoronaVirus in Nagpur : मेडिकल, एम्समध्ये लवकरच कोरोनाचे निदान : यंत्रसामग्री उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 00:27 IST2020-03-31T00:26:27+5:302020-03-31T00:27:33+5:30
कोरोना विषाणू संशयित रुग्णांच्या नमुन्यांचा अहवाल लवकर मिळण्यासाठी मेडिकल व ‘एम्स’मध्ये ‘पॉलिमर चेन रिअॅक्शन’ (पीसीआर) यंत्र उपलब्ध झाले आहे. कोरोनाची किट व ‘एनआयव्ही’कडून हिरवी झेंडी मिळाल्यास या आठवड्यात या दोन्ही रुग्णालयांच्या प्रयोगशाळेत कोरोनाची चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे.

CoronaVirus in Nagpur : मेडिकल, एम्समध्ये लवकरच कोरोनाचे निदान : यंत्रसामग्री उपलब्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणू संशयित रुग्णांच्या नमुन्यांचा अहवाल लवकर मिळण्यासाठी मेडिकल व ‘एम्स’मध्ये ‘पॉलिमर चेन रिअॅक्शन’ (पीसीआर) यंत्र उपलब्ध झाले आहे. कोरोनाची किट व ‘एनआयव्ही’कडून हिरवी झेंडी मिळाल्यास या आठवड्यात या दोन्ही रुग्णालयांच्या प्रयोगशाळेत कोरोनाची चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास, नमुने घेतलेल्या संशयित रुग्णांंना सहा ते १२ तास रुग्णालयात थांबण्याची वेळ कमी होईल. राज्यात कोरोनाचा शिरकाव होताच इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयाच्या (मेयो) विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेला (व्हीआरडीएल) कोरोनाची चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली. या प्रयोगशाळेमध्ये केवळ विदर्भच नाहीतर छत्तीसगड व मध्य प्रदेशातून कोरोना संशयितांचे नमुने येतात. अलीकडे नमुन्यांची संख्या वाढली आहे. यामुळे तीन पाळींमध्ये प्रयोगशाळा सुरू ठेवली जात आहे. आतापर्यंत ७३० नमुने तपासण्यात आले आहे. परंतु नमुन्यांची वाढती संख्या व अहवाल मिळण्यास होत असलेल्या उशिरामुळे रुग्णांवर उपचार करण्यासही उशीर होत आहे. विशेष म्हणजे, नमुने घेतलेल्या संशयित रुग्णाला अहवाल येईपर्यंत रुग्णालयातच सहा ते १२ तास थांबण्याची वेळ येते. नमुने वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने मेडिकल व अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) कोरोना विषाणूची चाचणी करण्याची तयारी करण्याच्या सूचना केल्या होत्या. या दोन्ही रुग्णालयांनीही स्वत:हून पुढाकारही घेतला होता. यामुळे नुकतेच दोन्ही रुग्णालयांच्या प्रयोगशाळेला ‘पीसीआर’ यंत्र उपलब्ध झाले आहे. यांच्या प्रयोगशाळाही सज्ज असून तपासणीसाठी लागणारी किट व पुण्याच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’च्या (एनआयव्ही) मंजुरीची प्रतिक्षा आहे.
या आठवड्यात चाचणी सुरू करण्याचा प्रयत्न
‘एम्स’च्या मायक्रोबायोलॉजी विभागात पीसीआर यंत्र उपलब्ध झाले आहे. ‘एनआयव्ही’कडून प्रयोगशाळेच्या जागेची पाहणी करून त्यांची मंजुरीही मिळाली आहे. आता केवळ चाचणीसाठी लागणाऱ्या किट्सची प्रतीक्षा आहे. त्या उपलब्ध झाल्यास या आठवड्यात कोरोनाची चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे.
-डॉ. विभा दत्ता, संचालक, एम्स