CoronaVirus : यवतमाळमध्ये आणखी एक पॉझिटिव्ह : विदर्भात रुग्णाची संख्या १११
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 21:37 IST2020-04-15T21:36:26+5:302020-04-15T21:37:40+5:30
सलग सहा दिवस नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या उच्चांक गाठत असताना बुधवारी नागपुरात एकाही रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आला नाही. मात्र यवतमाळ जिल्ह्यात एका रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आला. या रुग्णासह यवतमाळमध्ये रुग्णांची संख्या १३ तर विदर्भात १११ झाली आहे.

CoronaVirus : यवतमाळमध्ये आणखी एक पॉझिटिव्ह : विदर्भात रुग्णाची संख्या १११
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सलग सहा दिवस नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या उच्चांक गाठत असताना बुधवारी नागपुरात एकाही रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आला नाही. मात्र यवतमाळ जिल्ह्यात एका रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आला. या रुग्णासह यवतमाळमध्ये रुग्णांची संख्या १३ तर विदर्भात १११ झाली आहे. यातील १४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) आज बुधवारी ९६ नमुने तपासले. अमरावती जिल्ह्यातील ५४ तर यवतमाळ जिल्ह्यातील ४२ नमुने होते. यात यवतमाळ जिल्ह्यातील ६६ वर्षीय पुरुषाचा नमुना पॉझिटिव्ह आला. उर्वरित ९५ नमुने निगेटिव्ह आले. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) प्रयोगशाळेत ३३ नमुने तपासण्यात आले. यात भंडारा जिल्ह्यातील १५, वर्धा जिल्ह्यातील १, चंद्रपूर जिल्ह्यातील ११ तर नागपुरातील ६ नमुने होते. हे सर्वच नमुने निगेटिव्ह आले. एकूण १२८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. नागपुरात आतापर्यंत ५६, गोंदियात १, अमरावतीमध्ये ५, बुलडाण्यात २१, अकोल्यात १४, यवतमाळमध्ये १३ तर वाशिममध्ये १, अशी विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या १११ झाली आहे. यातील चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपूरच्या मेडिकलला आज तपासणी किट उपलब्ध न झाल्याने प्रयोगशाळेतील कामकाज ठप्प होते.
वर्धेत पकडलेल्या ट्रकमधील ४४ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह
काही दिवसांपूर्वी वर्धेत एक ट्रक पोलिसांनी पकडला. हा ट्रक छत्तीसगडकडे जात होता. ट्रकमध्ये ४४ व्यक्ती लपून बसल्या होत्या. कोरोना संशयित म्हणून या व्यक्तींची नोंद करून यांचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. मंगळवारी रात्री तपासण्यात आलेल्या नमुन्यांचा अहवाल बुधवारी सकाळी प्राप्त झाला. सर्वच नमुने निगेटिव्ह आले.