कोरोनामुक्तीचा दर ९३ वरून ९१ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:27 IST2020-12-12T04:27:16+5:302020-12-12T04:27:16+5:30

नागपूर : राज्यातील कोरोनामुक्तीचा दर ९३.४५ टक्के आहे. मुंबईचा हाच दर ९२ टक्के तर नागपूरचा ९१.७० टक्क्यांवर आला आहे. ...

Coronation release rate from 93 to 91 percent | कोरोनामुक्तीचा दर ९३ वरून ९१ टक्क्यांवर

कोरोनामुक्तीचा दर ९३ वरून ९१ टक्क्यांवर

नागपूर : राज्यातील कोरोनामुक्तीचा दर ९३.४५ टक्के आहे. मुंबईचा हाच दर ९२ टक्के तर नागपूरचा ९१.७० टक्क्यांवर आला आहे. दिवाळीपूर्वी, १२ नोव्हेंबर रोजी ९३.६१ टक्के हा दर होता. रुग्णसंख्या वाढीचा दर स्थिर असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाल्याने चिंतेचे वातावरण आहे. शुक्रवारी ३९८ रुग्ण व ११ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ११६५३५ तर मृतांची संख्या ३७८५वर पोहचली. आज ३२४ रुग्ण बरे झाले असून कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या १०६८१८ झाली आहे.

ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात नागपूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने मोठी चिंता निर्माण झाली होती. लोकसंख्या जास्त असलेली घनता, दाट लोकवस्ती अशा विविध कारणांमुळे कोरोनावाढीचा दर मोठा होता. यावर नियंत्रण मिळविण्यात काहीसे यश आले आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्यात दैनंदिन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त राहत असताना आता याच्या उलट चित्र आहे. शुक्रवारी ५३७१ चाचण्या झाल्या. यात ४१९२ आरटीपीसीआर तर ११७९ रॅपीड अँटिजेन चाचण्या होत्या. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ३०८, ग्रामीणमधील ८६ तर जिल्हाबाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे. शहर, ग्रामीण व जिल्हाबाहेरील प्रत्येकी ४ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. सध्या ५९३२ रुग्ण उपचाराखाली असून १५२८ रुग्ण शासकीयसह खासगी इस्पितळात भरती आहेत.

-मेडिकलच्या सुरक्षा रक्षकाचा कोरोनाने मृत्यू

मेडिकलमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या ‘महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या’ एका जवानाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. प्राप्त माहितीनुसार, ३४ वर्षीय या जवानाला लक्षणे होती. परंतु कामाच्या व्यापामुळे त्यांनी दुर्लक्ष केले. ४ डिसेंबर रोजी प्रकृती खालवल्याने मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. मात्र, नातेवाईकांनी येथून डिस्चार्ज घेऊन लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये भरती केले. जवानाची प्रकृती सुधारत नसल्याचे पाहत पुन्हा ८ डिसेंबर रोजी मेडिकलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना १० डिसेंबर रोजी मृत्यू झाला. सुरक्षा रक्षकाचा हा पहिलाच मृत्यू असल्याचे बोलले जात आहे. या पूर्वी मेडिकलमधील सात एमएसएफचे जवान पॉझिटिव्ह आले होते.

::कोरोनाची आजची स्थिती

-दैनिक संशयित : ५३७१

-बाधित रुग्ण : ११६५३५

_-बरे झालेले : १०६८१८

- उपचार घेत असलेले रुग्ण : ५९३२

- मृत्यू : ३७८५

Web Title: Coronation release rate from 93 to 91 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.