कोरोनाबंदीमुळे अंत्यदर्शनालाही मुकले  : काढावी लागली पोलीस परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 11:36 PM2020-03-24T23:36:20+5:302020-03-24T23:37:31+5:30

कोरोनाची दहशत सर्वत्र व्यापून उरली आहे. याची झळ नागपुरातील ढोक परिवारालाही बसली. या कुटुंबातील भीमराव ढोक यांचा अंत्यविधी कोरोनाच्या संचारबदीमुळे मोजक्या आप्तेष्टांच्या उपस्थितीत आणि तोसुद्धा प्रशासनाची परवानगी काढूनच करावा लागला.

Coronation bans funeral procession: Police permission to be taken | कोरोनाबंदीमुळे अंत्यदर्शनालाही मुकले  : काढावी लागली पोलीस परवानगी

कोरोनाबंदीमुळे अंत्यदर्शनालाही मुकले  : काढावी लागली पोलीस परवानगी

Next
ठळक मुद्दे मोजक्या आप्तेष्टांच्या उपस्थितीत अंत्यविधी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘मरण आणि तोरण चुकवू नये’, असा आपल्याकडे पूर्वापार रिवाज आहे. म्हणूनच लग्नाला आणि मरणाला सारे आप्तेष्ट, मित्र गोळा होतात. मरणाला तर बोलावण्याचीही वाट पाहिली जात नाही. मात्र काळ बदलला. कोरोनाची दहशत सर्वत्र व्यापून उरली आहे. याची झळ नागपुरातील ढोक परिवारालाही बसली. या कुटुंबातील भीमराव ढोक यांचा अंत्यविधी कोरोनाच्या संचारबदीमुळे मोजक्या आप्तेष्टांच्या उपस्थितीत आणि तोसुद्धा प्रशासनाची परवानगी काढूनच करावा लागला.
ज्याच्यासोबत आयुष्याचे क्षण घालविले, सुखदु:खाचे क्षण वाटले, भौतिक जगाचे व्यवहार केले अशा नातेवाईकाच्या किंवा शेजाऱ्याच्या आयुष्याचा अखेरचा सोहळा आपल्या उपस्थितीत व्हावा अशी भावना सर्वांचीच असते. म्हणूनच नातेवाईक आणि सखे-सोबती दूरवरून पोहचतात. एकदाचे अंत्यदर्शन घेऊन भडाग्नी देतानाचा अखेरचा निरोप घेता यावा या भावनेने रक्ताचे आणि प्रेमाचे नातेवाईक एकवटतात. मात्र कोरोनाने या भावनांचाही चकनाचूर केला आहे.
नागार्जून कॉलनी, जरीपटका नारा रोड येथील भीमराव ढोक (६८) यांच्या निधनाच्या निमित्ताने हा अनुभव मंगळवारी आला. डॉक्टरांनी त्यांना अ‍ॅन्जिओप्लॅस्टी सांगितली होती. पण अ‍ॅन्जिओप्लॅस्टीनंतर त्यांची प्रकृती खालावली व मृत्यू झाला. मंगळवारी अंत्ययात्रा काढून अंत्यविधी करायचे होते. मात्र लागलेल्या संचारबंदीमुळे अंत्ययात्रा कशी काढावी, असा प्रश्न कुटुंबीयांना पडला. त्यांनी जरीपटका पोलिसांना मृत्यूची माहिती कळविली. पोलिसांनी कायदा आणि प्रसंगाचे गांभीर्र्य लक्षात घेऊन अंत्ययात्रेसाठी फक्त ५० लोकांना उपस्थित राहता येईल, अशी परवानगी दिली. सुरक्षेचे उपाय योजण्यासाठीही बजावले. सर्वांना सुरक्षित अंतर ठेवण्यास, तोंडाला मास्क बांधण्याचा सल्ला दिला. अंत्ययात्रेत जरीपटका ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाही पाठविले होते. या सर्व खबरदारीनंतर त्यांच्या पार्थिवावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नातेवाईक घरापर्यंत आले, मात्र घाटावर पोहचू शकले नाही. मित्रपरिवार, नातलगांचा गोतावळा अंत्यविधीला मुकला. बुधवारी होणाऱ्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमातही घरातील चार माणसेच राहणार आहे. तिसºया दिवसाचाही कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती माजी आमदार डॉ. मिलींद माने यांनी दिली. माने हेसुद्धा या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. त्यासाठी त्यांनीही पोलिसांकडून परवानगी मागितली होती.
कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे. दोन पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर मनाई आहे. गुणाकार पद्धतीने वाढणाऱ्या या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी हे प्रयत्न आहेत.

Web Title: Coronation bans funeral procession: Police permission to be taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.