तीन महिन्यानंतरही कोरोनाचे रुग्ण रुग्णालयातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:11 IST2021-07-14T04:11:09+5:302021-07-14T04:11:09+5:30

नागपूर : कोरोनाशी दोन हात करून त्यांनी कोरोनावर मात केली. मात्र, फुफ्फुसाच्या काही भागात ‘फायब्रोसिस’ झाल्याने आजही त्यांना ऑक्सिजनवर ...

Corona's patient is still in hospital after three months | तीन महिन्यानंतरही कोरोनाचे रुग्ण रुग्णालयातच

तीन महिन्यानंतरही कोरोनाचे रुग्ण रुग्णालयातच

नागपूर : कोरोनाशी दोन हात करून त्यांनी कोरोनावर मात केली. मात्र, फुफ्फुसाच्या काही भागात ‘फायब्रोसिस’ झाल्याने आजही त्यांना ऑक्सिजनवर दिवस काढावे लागत आहेत. मेयो व मेडिकलमध्ये असे २० रुग्ण आहेत. मागील तीन ते चार महिन्यांपासून ते रुग्णालयातच आहेत. आज नाही तर उद्या बरे होऊन घरी जाऊ, या आशेवर उपचाराला प्रतिसाद देत आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक भयावह ठरली. जानेवारी ते जून या कालावधीत ३ लाख ५३ हजार २८५ नवे रुग्ण आढळून आले तर, ५ हजार ७५ रुग्णांचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात एकाच दिवशी ७ हजार ९९९ रुग्णांची नोंद झाली होती. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शासकीय व खासगी रुग्णालयात बेड फुल्ल झाले होते. त्या कठीण परिस्थितीत ज्या रुग्णांना बेड मिळाले व कोरोनातून बरे झाले ते फुफ्फुसाच्या आजाराने आजही ऑक्सिजन थेरपीवर दिवस काढत आहेत. मेडिकलमध्ये असे तीन महिला व सात पुरुष तर, मेयोमध्ये दोन पुरुष व आठ महिला आहेत.

- पोस्ट कोविड उपचारात ४० वरील रुग्णांची संख्या अधिक

फेब्रुवारी ते जून या कालावधीत पोस्ट कोविडच्या उपचारासाठी मेयोमध्ये ११७५ तर मेडिकलमध्ये १३२८ रुग्ण आले. मेडिकलमधील या रुग्णांमध्ये १३४ तर, मेयोमध्ये १० रुग्णांना पल्मनरी फायब्रोसिसचे निदान झाले. या दोन्ही रुग्णालयात प्रत्येकी १० रुग्ण उपचाराखाली आहेत. त्यांचे वय ४० वर्षांपासून पुढे आहे. वयाच्या पन्नाशीनंतर दिसून येणारा फायब्रोसिस कोरोनामुळे वयाच्या चाळिशीतच दिसून आल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे.

- कोमॉर्बिडिटी असलेल्या ५० टक्के रुग्णांना फायब्रोसिसची लक्षणे

कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये अनियंत्रित मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, थायरॉईड आदी ‘कोमॉर्बिडिटी’ असल्यास लंग फायब्रोसिस होण्याची शक्यता ५० टक्क्यांनी वाढते. सध्या मेयोमध्ये भरती असलेल्या १० रुग्णांना ‘कोमॉर्बिडिटी’ असून, त्यांच्यावर ऑक्सिजन थेरपी दिली जात असल्याची माहिती मेयोच्या श्वसन रोग विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. ज्ञानशंकर मिश्रा यांनी दिली.

-फुफ्फुसाच्या कार्याची गती मंदावलेल्या रुग्णांमध्ये वाढ ()

कोरोनाचा विषाणू थेट फुफ्फुसावरच हल्ला चढवितो. यामुळे कोरोनाची गंभीर लक्षणे असलेला रुग्ण बरा झाला तरी त्याच्यातील काही रुग्णांच्या फुफ्फुसाच्या कार्याची गती मंदावलेली असते. कारण, फुफ्फुसाच्या काही भागात फायब्रोसिस झालेला असतो. मेयोमध्ये असे १० रुग्ण आहेत ज्यांना ७५ दिवसापेक्षा अधिक कालावधी होऊनही अजूनही ऑक्सिजनवर आहेत. विशेष म्हणजे, कोरोनामुळे रुग्णालयात भरती झालेल्या २४ टक्के रुग्णांच्या फुफ्फुसाचे कार्य नीट चालत नसल्याचे वुहानमध्ये झालेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे.

-डॉ. ज्ञानशंकर मिश्रा, श्वसनविकार विभाग, मेयो

Web Title: Corona's patient is still in hospital after three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.