कोरोनाबाधित रुग्णाचा प्राथमिक आरोग्य केंद्रात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:10 IST2021-04-30T04:10:14+5:302021-04-30T04:10:14+5:30
कोंढाळी : कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी गणेशपूर येथील एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. कोंढाळी पोलिसांनी ग्रामपंचायतीच्या मदतीने ...

कोरोनाबाधित रुग्णाचा प्राथमिक आरोग्य केंद्रात मृत्यू
कोंढाळी : कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी गणेशपूर येथील एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. कोंढाळी पोलिसांनी ग्रामपंचायतीच्या मदतीने दुधाळा स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. कोंढाळीपासून ५ कि.मी अंतरावरील गणेशपूर येथील ४० वर्षीय व्यक्तीचा कोविड चाचणी रिपोर्ट १७ एप्रिलला पॉझिटिव्ह आला होता. पण त्याने रुग्णालयात उपचार घेण्याऐवजी घरीच उपचार घेतले. मंगळवारी अस्वस्थ वाटत असल्याने तो दुपारी १२ वाजताच्या सुमारास कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आला. पण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली नाही. कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांची प्रकृती अधिक खालावली. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी दातीर यांनी तातडीने उपचार केले. पण त्याला वाचविण्यात अपयश आले. डॉ. दातीर यांनी ही माहिती कोंढाळीचे ठाणेदार विश्वास फुल्लरवार व कोंढाळीचे ग्रामविकास अधिकारी दिलीपसिंह राठोड यांना दिली. यानंतर कोंढाळीचे पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र सोनावले, सुखदेव धुडधुळे , होमेश्वर वाईलकर, तुळशीराम चामटे आदी कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले. पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा मृतदेह एका गाडीत टाकून दुधाळा येथील स्मशानभूमीवर नेला. तिथे सरपंच केशव धुर्वे, उपसरपंच स्वप्नील व्यास व ग्रामविकास अधिकारी व पोलिसांच्या उपस्थितीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.