जिल्ह्यातील ५९ गावांनी कोरोनाला ठेवले दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:07 IST2021-05-30T04:07:00+5:302021-05-30T04:07:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनामुळे बहुतांश गावे तसेच शहरे बाधित होऊन मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत ...

जिल्ह्यातील ५९ गावांनी कोरोनाला ठेवले दूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे बहुतांश गावे तसेच शहरे बाधित होऊन मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच जिल्ह्यातील ५९ गावांनी कोरोनाला आपल्या गावात प्रवेश दिला नाही. या गावांमध्ये मागील वर्षीच्या मार्चपासून एकाही नागरिकाला कोरोनाची लागण झाली नाही. गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून केलेल्या उपक्रमामुळे या गावांत कोरोना पोहोचू शकला नाही.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी याबाबतची माहिती दिली. जिल्ह्यातील १,६०५ गावांपैकी ५९ गावे कोरोनापासून दूर राहिली आहेत. या गावांमध्ये मागील वर्षाच्या मार्चपासून एकही रुग्ण आढळलेला नाही अथवा कोणीही बाधित झालेले नाही.
कोरोनाला दूर ठेवणाऱ्या गावांमध्ये काटोल तालुक्यातील सर्वाधिक ११ गावांचा समावेश आहे. त्याबरोबरच नागपूर तालुक्यातील १० गावांनी कोरोनाला थोपविण्यात यश मिळविले आहे. हिंगणा तालुक्यातील ११९ गावांपैकी सात गावांमध्ये कोरोनाची बाधा झालेली नाही, कळमेश्वर तालुक्यातील ८६ गावांपैकी तीन गावे, भिवापूर तालुक्यातील १०६ गावांपैकी दोन गावे, कामठी तालुक्यातील ७८ गावांपैकी दोन गावे, मौदा तालुक्यातील १२४ गावांपैकी सहा गावे, नागपूर तालुक्यातील १३४ गावांपैकी दहा गावे, नरखेड तालुक्यातील ११८ गावांपैकी चार गावे, पारशिवनी तालुक्यातील १०७ गावांपैकी एक गाव, रामटेक तालुक्यातील १५२ गावांपैकी आठ गावे, सावनेर तालुक्यातील १३६ गावांपैकी एक गाव, तर उमरेड तालुक्यातील १३८ गावांपैकी चार गावांनी कोरोनाला वेशीवरच थांबविले आहे.
स्वच्छता, सुरक्षित अंतर व मास्कला दिले प्राधान्य
कोरोनाचा समर्थपणे मुकाबला करतानाच गावातील स्वच्छता, सामाजिक अंतर तसेच मुखपट्टी घालण्याला प्राधान्य दिले आहे. इतर गावांतून आलेल्या व्यक्तींची तपासणी करून कोरोनाची लक्षणे असल्यास प्रतिबंध घालणे आदी उपाययोजना या गावांनी केल्या आहेत. कोरोनाला दूर ठेवणाऱ्या जिल्ह्यातील ५९ गावांचा आदर्श सर्व गावांना आदर्श असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले.