नागपूरकरांच्या आरोग्यासाठी ‘कोरोना वॉरियर्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 11:27 AM2020-03-16T11:27:59+5:302020-03-16T11:29:20+5:30

आरोग्यसेवेचे व्रत घेतलेले मेयो, मेडिकलसह आरोग्य विभागाचे डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी स्वत:च्या जीवावर उदार होऊन कोरोना संशयित व पॉझिटिव्ह रुग्णाला अहोरात्र सेवा देत आहेत.

Corona Warriors for the health of Nagpur | नागपूरकरांच्या आरोग्यासाठी ‘कोरोना वॉरियर्स’

नागपूरकरांच्या आरोग्यासाठी ‘कोरोना वॉरियर्स’

Next
ठळक मुद्देत्यांच्या कर्तृत्वाला सलाम मेयो, मेडिकल व आरोग्य विभागाची अहोरात्र सेवा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरानो विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा लागू करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालय, मॉल, चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र आरोग्यसेवेचे व्रत घेतलेले मेयो, मेडिकलसह आरोग्य विभागाचे डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी स्वत:च्या जीवावर उदार होऊन कोरोना संशयित व पॉझिटिव्ह रुग्णाला अहोरात्र सेवा देत आहेत. खऱ्या अर्थाने ते ‘कोरोना वॉरियर्स’ ठरले आहेत. त्यांच्या या कर्तृत्वाला नागपूरकरांनी सलाम केला आहे.
देशातील १३ राज्यांमधील नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्वच राज्यातील बाधितांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली आहे. कोरोनाची दहशत घराघरात पोहचली आहे. प्रत्येक जण प्रतिबंधक उपाययोजना करीत आहे, असे असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), उपसंचालक आरोग्य सेवा व महानगरपालिकेचे आरोग्य विभाग कोरोनाच्या विरोधात उभा ठाकला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांची चिंता आहे. घरून निघताना काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. बाहेर पडत असताना मोठ्यांच्या, चिमुकल्यांच्या डोळ्यातील चिंता बरेच काही सांगून जात आहे. मात्र, कोरोना विरोधातील लढाईतील हे योद्धे रुग्णालयात आल्यावर सर्वकाही विसरून रुग्णसेवा देत आहेत.

नेमके कसे करतात डॉक्टर काम?
डॉक्टर्सना त्यांच्या कामाच्या वेळाचे नियोजन करून देण्यात आले आहे. ते ठरवून दिलेल्या वेळेत मेयो, मेडिकलच्या कोरोना रुग्णांसाठी असलेल्या वॉर्डात हजर असतात.
काही आवश्यकतेनुसार १२ ते १५ तास काम करतात. रुग्णांना भेटणे, नोंदणी करणे, त्यांच्याशी संवाद साधणे, उपचार करणे, नमुने घेणे, त्याचा अहवाल संबंधितांपर्यंत पोहचविणे, बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेणे, त्यांना रुग्णालयात आणणे आदी कार्य करीत आहेत.
बाधित देशातून आलेल्या किंवा पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या परंतु नमुने निगेटिव्ह आलेल्यांना घरीच राहण्याचा सल्ला देत दिवसातून दोनवेळा फोनद्वारे त्यांची प्रकृतीची माहिती घेत आहेत.

रुग्णसेवेच्या नियोजनात यांचाही वाटा महत्त्वाचा
रुग्णसेवेच्या नियोजनात मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. कांचन वानखेडे,औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे, औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पराते, मायक्रोबायोलॉजी विभागप्रमुख डॉ. शर्मिला राऊत, आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर यांचाही वाटा महत्त्वाचा आहे.

Web Title: Corona Warriors for the health of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.