सांडपाण्यातूनही पसरला कोरोनाचा विषाणू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2021 08:11 PM2021-10-07T20:11:19+5:302021-10-07T20:13:01+5:30

Nagpur News ‘सीम्स’ हॉस्पिटलने केलेल्या एका अभ्यासात सांडपाण्याच्या १२०० पैकी जवळपास ७५ ते ८५ टक्के नमुन्यात कोरोनाचे विषाणू आढळून आल्याचे पुढे आले.

Corona virus spread through sewage! | सांडपाण्यातूनही पसरला कोरोनाचा विषाणू!

सांडपाण्यातूनही पसरला कोरोनाचा विषाणू!

Next
ठळक मुद्देसीम्स हॉस्पिटलचा अभ्यास सांडपाण्यात कोरोनाचे ८५ टक्के विषाणू

 

नागपूर : केवळ बाधित व्यक्तीच्या संपर्कातूनच किंवा त्याने हाताळलेल्या वस्तूपासूनच कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव झाला, असे नसून सांडपाण्यातूनही याचा फैलाव झाल्याची शक्यता आता पुढे येत आहे. ‘सीम्स’ हॉस्पिटलने केलेल्या एका अभ्यासात सांडपाण्याच्या १२०० पैकी जवळपास ७५ ते ८५ टक्के नमुन्यात कोरोनाचे विषाणू आढळून आल्याचे पुढे आले.

‘सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ (सीम्स) आणि ‘नॉटिंघम’ विद्यापीठाच्या वतीने नागपूर जिल्ह्यातील सांडपाण्यातून प्रसारित होणाऱ्या ‘कोविड-१९’ आणि इतर संसर्गजन्य आजारावरील (व्हायरल इन्फेक्शन्सचा) संशोधनाचा प्रकल्प घेण्यात आला. याची माहिती देण्यासाठी गुरुवारी आयोजित पत्रपरिषदेत सीम्स हॉस्पिटलचे रिसर्च डायरेक्टर डॉ. राजपालसिंह कश्यप यांनी दिली. यावेळी सीम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. लोकेंद्र सिंह, डॉ. अमित नायक व डॉ. अली अब्बास उपस्थित होते.

-दुसरी लाट येण्यापूर्वीच दूषित नमुने आढळून आले

डॉ. कश्यप म्हणाले, हा अभ्यास ‘ग्लोबल चॅलेंज रिसर्च फंड’च्या (जीसीआरएफ) मदतीने ‘आयसीएमआर’च्या परवानगीने व मनपाच्या सहकार्याने करण्यात आला. मनपाच्या १० झोनसह ग्रामीणमधील तालुक्यांमधून १२०० ते १४०० नमुने घेण्यात आले. याची सुरुवात जानेवारी महिन्यापासून झाली. त्यावेळी घेतलेल्या सांडपाण्याच्या अनेक नमुन्यांमध्ये कोरोनाचे विषाणू आढळून आले. दुसरी लाट येण्यापूर्वीच विषाणू आढळून येणे हे आमच्यासाठी धक्कादायक होते. परंतु लाट ओसरताच सांडपाण्यातील विषाणूचे प्रमाणही कमी झाले. या नमुन्याची आरटीपीसीआर तपासणी जयपूर येथील बी. लाल इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेक्नाॅलॉजी येथे करण्यात आली. संशोधनावरील निष्कर्ष पुढील सहा महिन्यांत सादर केले जाईल.

-सांडपाण्याचा ९० टक्के नमुन्यांमध्ये ‘रोटा व्हायरस’

सांडपाण्यात कोरोनासोबतच विविध गंभीर आजार पसरविण्यासाठी कारणीभूत असलेले विषाणूसुद्धा दिसून आले. यात ‘हेपॅटायटीस ए’ व ‘ई’, ‘रोटा व्हायरस’, ‘इन्ट्रो व्हायरस’, ‘ॲडेनो व्हायरस’ व ‘नोरो व्हायरस’ आदींचा समावेश होता. विशेष म्हणजे, लहान मुलांच्या अतिसाराला कारणीभूत असलेला ‘रोटा व्हायरस’ हा ९० टक्के नमुन्यांमध्ये आढळून आला.

-सांडपाण्यात मिसळत आहेत औषधी

डॉ. कश्यप म्हणाले, अभ्यासात असेही समोर आले की, शहरातच नव्हे तर ग्रामीणमधील सांडपाण्यात औषधी मिसळण्याचे प्रमाण मोठे आहे. यात मधुमेह, हृदयविकाराच्या औषधांसोबतच अँटिबायोटिक्स औषधी आढळून आल्या.

-६९ टक्के लोकांच्या वाढल्या अँटिबॉडीज

‘सीम्स’च्या संशोधन पथकाने लसीकरण मोहिमेच्या सुरुवातीच्या काळात ‘सिरो सर्वेक्षण’ केले. यात शहरातील ६९ टक्के लोकांमध्ये ‘अँटिबॉडीज’ निर्माण झाल्याचे म्हणजे त्यांच्या नकळत कोरोना होऊन गेल्याचे आढळून आले. सर्वेक्षणात लसीकरण न झालेल्या ४०० पैकी ६९ टक्के लोकांमध्ये तर लसीकरण झालेल्या ६०० पैकी ८८ टक्के लोकांमध्ये अँटिबॉडीज निर्माण झाल्याचेही निष्पन्न झाले.

-लसीकरणानंतर अँटिबॉडीज झाल्या कमी

एका प्रश्नाला उत्तर देताना डॉ. कश्यप म्हणाले, लसीकरणानंतर तपासलेल्या अँटिबॉडीज व आता सहा महिन्यांनंतर तपासलेल्या अँटिबॉडीजच्या प्रमाणात घट दिसून आले. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यास पुन्हा अँटिबॉडीज वाढतात. यामुळे ‘बुस्टर डोस’ विषयीचा निर्णय शासनच घेईल.

Web Title: Corona virus spread through sewage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.