मनपा प्रशासन सतर्क : हॉटस्पॉट भागावर नजर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या दक्षिण-पश्चिम भागावर मनपा प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रीत आहे. लक्ष्मीनगर झोनमधील खामला, जयताळा भागातील १५२ सुपर स्प्रेडरची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. धंतोली झोनमधील एलआयसी कॉलनीत ३५ बाधित आढळून आल्याने कॉलनी सील केली आहे.
मागील काही दिवसांपासून शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात प्रामुख्याने दक्षिण-पश्चिम व दक्षिण नागपुरातील रुग्णांचा समावेश आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नसल्याच्या तक्रारी असल्याने प्रशासन जागे झाले. आता यावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. रविवारी खामला व जयताळा भागातील भाजी विक्रेते, हॉकर्स, सलून चालकांची कोरोना चाचणी करण्यात आली. कॅम्पस खामला बाजार, नरेंद्र नगर बाजार, इनकम टॅक्स कार्यालय, आयबीआय कॉलनी, रेल्वे कॉलनी आदी वस्त्यांतील नागरिकांची चाचणी करण्यात आली.
हॉटस्पॉट ठरलेल्या भागातील नागरिकांकडून होम आयसोलेशनच्या नियमाचे पालन केले जात नाही. बाधित घराबाहेर पडतात. यामुळे संक्रमणाचा धोका आहे. होम आयसोलेशनमध्ये असलेल्यांनी घराबाहेर पडू नये, यासाठी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. मनपा आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र, त्यानुसार कारवाई होताना दिसत नाही.