कोरोनाचा संशयित रुग्ण निगेटिव्ह : नागपूर विमानतळावर २६४ प्रवाशांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 23:42 IST2020-03-09T23:41:19+5:302020-03-09T23:42:48+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमनातळावर दोहा आणि शारजाह येथून आलेल्या २६४ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यात एकही प्रवासी संशयित आढळला नाही. यामुळे हळूहळू कोरोना विषाणूची दहशत कमी होत असल्याचे चित्र आहे.

कोरोनाचा संशयित रुग्ण निगेटिव्ह : नागपूर विमानतळावर २६४ प्रवाशांची तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकलमध्ये रविवारी भरती करण्यात आलेल्या कोरोना संशयित चंद्रपूर येथील २४ वर्षीय रुग्णाचे नमुने सोमवारी ‘निगेटिव्ह’ आले. आतापर्यंत मेडिकलमध्ये दाखल झालेल्या सातही संशयित रुग्णांना हा विषाणू नसल्याचे निष्पन्न झाले आहे. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमनातळावर दोहा आणि शारजाह येथून आलेल्या २६४ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यातही एकही प्रवासी संशयित आढळला नाही. यामुळे हळूहळू कोरोना विषाणूची दहशत कमी होत असल्याचे चित्र आहे.
संशयित २४ वर्षीय रुग्णाने १२ ते २८ फेब्रुवारीदरम्यान उझबेकिस्तान व कझिकस्तान येथून प्रवास केला होता. गेल्या पाच-सहा दिवसांपासून ताप, सर्दी, खोकला व अंगदुखी असल्याने कोरोना विषाणू संशयित म्हणून मेडिकलच्या वॉर्ड क्र. २५ मध्ये भरती करण्यात आले. त्याचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्याचा अहवाल येताच पुन्हा एकदा आरोग्य विभागाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. तज्ज्ञांच्या मते, नागरिकांनी खबरदारी घेतल्यास, प्रतिबंधक उपाय केल्यास हा आजार दूर ठेवण्यास मदत होऊ शकते.
दुबईमधून आलेला रुग्ण संशयित
दुबई येथून प्रवास करून आलेला एक पुरुष रुग्णाला दोन-तीन दिवसांपासून ताप, सर्दी व खोकला आदी लक्षणे आहेत. त्याने याची माहिती मेडिकलच्या वैद्यकीय अधीक्षकांना दिली आहे. त्याला भरती होण्यास सांगण्यात आले आहे. परंतु त्याने तूर्तास नकार दिला आहे. आरोग्य विभाग त्यांच्याशी संपर्क साधून असल्याचे सांगण्यात येते.
विमानतळावर प्रवाशांची ‘थर्मल स्कॅनिंग’
कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी शहरातील आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. मुंबई, पुणेपाठोपाठ नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारपासून प्रवाशांची ‘थर्मल स्कॅनिंग’ सुरू करण्यात आली आहे. यासाठी आरोग्य विभागाच्या डॉक्टरांची एक चमू तैनात आहे. प्राप्त माहितीनुसार, आतापर्यंत दोहा आणि शारजाह येथून आलेल्या २६४ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यातील एकही रुग्ण संशयित आढळून आलेला नाही.